केडीएमसी महापौर बंगल्याची दुरवस्था

कल्याण; कल्याण-डोंबिवली महापालिकाने १५ वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारलेला महापौर बंगला सद्यस्थितीत झाडा-झुडपाच्या विळख्यात आणि सभोवताली वाढलेल्या गवताच्या आणि गंजलेली कुलुप आणि भग्न भिंतींनी वेढलेला असल्याने या वस्तुला अवकळा आली आहे.

सन २०१० मध्ये त्या वेळीचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते या इमारतीचे उद्‌घाटन झाले होते. मात्र, आज तोच बंगला वाळवी लागलेल्या फर्निचर आणि तुटलेल्या खिडक्यांची तावदाने यामुळे दुरावस्था होत असल्याचे चित्र दिसत आहे.

‘केडीएमसी'च्या भोंगळ कारभाराचे आणि नियोजन शून्यतेचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आधारवाडी कारागृहाजवळ २०१० साली कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारलेला महापौर बंगला होय. शहराच्या महापौरांना एक सन्माननीय शासकीय निवासस्थान मिळावे या उद्देशाने बंगला उभारण्यात आला होता. मात्र, उद्‌घाटनानंतर त्वरितच सदर बंगला कायदेशीर आणि प्रशासकीय वादात अडकला आणि त्यामुळे कोणीही महापौरांनी येथे वास्तव्य केले नाही. जनतेच्या पैशातून उभा राहिलेला महापौर बंगला अनेक वर्षे ओस पडला राहिला. २०१८ मध्ये, तत्कालीन महापौर वनिता राणे यांनी लाखो रुपये खर्च करुन याचे नुतनीकरण केले आणि काही कालावधीसाठी तेथे निवासही केला. पण, त्यांच्या कार्यकाळानंतर सदर वास्तू पुन्हा प्रशासनाच्या पूर्ण दुर्लक्षाचे बळी ठरली.

आज या बंगल्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आह. बंगल्याच्या भोवती प्रचंड प्रमाणात झाडे आणि झुडपे वाढली आहेत, ज्यामुळे सुरक्षा रक्षकही आत जाण्यास कचरतात. दरवाजे तुटले आहेत, कुलुपांना गंज चढला आहे, फरशीवर मातीचे थर साचले आहेत आणि परिसरात दारुच्या रिकाम्या बाटल्यांचा ढीग आहे. रात्रीच्या वेळी सदर सरकारी मालमत्ता नशेबाज आणि समाजकंटकांचा अड्डा बनली आहे. या गंभीर विषयावर ‘केडीएमसी'चे उपायुक्त रमेश मसाळ यांनी केवळ चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, चौकशी कधी पूर्ण होईल याची कोणालाच खात्री नाही.

विकासाच्या नावाखाली जनतेचा पैसा असाच मातीमोल होत असल्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप असून महापौर बंगला ‘केडीएमसी'च्या निष्काळजीपणाचे आणि सार्वजनिक विश्वासाच्या नुकसानीचे प्रतिक ठरला आहे. प्रशासनाने आपल्या मालमत्ताकडे डोळस दुष्टीकोन ठेवून देखभाल करीत त्यांचे जतन केले पाहिजे, अशी मागणी यानिमित्ताने जाणकार करदाते नागरिक करीत आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली