खारघर मधील ११० घरांची अनधिकृत इमारत निष्कासित
खारघर : खासगी विकासकाने कोणत्याही परवानगीविना खारघर सेक्टर-५ मधील मित्र हॉस्पिटल आणि हेदोरवाडी पाड्यालगत बेकायदा उभारलेली अनधिकृत इमारत सिडको अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाद्वारे जमीनदोस्त करण्यात आली. मात्र, या बेकायदा इमारतीत घरे विकत घेऊन आणि भाड्याने वास्तव्य करणाऱ्या कुटुंबियांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. सदर बांधकाम व्यावसायिकावर कारवाई करुन घरांसाठी गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळावी, अशी मागणी या इमारतीमधून रस्त्यावर आलेल्या रहिवाशांकडून केली जात आहे.
खारघर ग्रामपंचायत अस्तित्वात असतांना एका बांधकाम व्यावसायिकाने राजकीय व्यक्तीच्या सहकार्याने अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु केले होते. याविषयी सिडको अधिकाऱ्यांना माहिती प्राप्त होताच सदर बांधकामावर थातूर-मातुर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर अपूर्ण अवस्थेत असलेले बेकायदा इमारतीचे बांधकाम ‘जैसे थे' स्थितीत होते. मात्र, सिडको प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने सदर खाजगी बांधकाम व्यावसायिकाने पोटमाळ्यांसह ६ मजली मोठी अनधिकृत इमारत उभारली.
स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर इमारतीत दुकान गाळे, वन रुम किचन आणि वन बीएचके आकाराची ११० घरे उभारली. त्यातील काही घरांची विक्री झाली होती तर काहींना घर भाड्याने दिले होते. सिडको अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे अधिकारी २ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता जेसीबी, पोकलन आणि पोलीस पथकासह घटनास्थही दाखल झाले. इमारतीत वास्तव्य करणाऱ्या कुटुंबियांना बाहेर काढून सकाळी सदर बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरु करण्यात आली. विशेष म्हणजे सदर इमारतीत घरे विकत घेवून आणि भाड्याने वास्तव्य करणाऱ्या महिला, लहान मुले-मुली आणि पुरुष घरातील सामान घेवून रस्त्यावर उभे होते. बेकायदा इमारतीवर तोडक कारवाईवेळी सिडको अनधिकृत बांधकाम मुख्य नियंत्रक तथा अपर जिल्हाधिकारी शिवराज पाटील यांच्यासह इतर सिडको अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे बेकायदा इमारतीवर तोडक कारवाई करताना धुलिमुळे काम करणारे कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांना धुळीचा त्रास होवू नये म्हणून पाण्याची फवारणी केली जात होती.
दरम्यान, गोरगरिब कुटुंबांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बेकायदा इमारतीतून संसार रस्त्यावर आलेल्या नागरिकांकडून केली जात आहे.
नियोजनबध्दरित्या निष्कासन कारवाई
अनधिकृत इमारतीला ‘हिल व्हयू अपार्टमेंट' नाव देण्यात आले होते. सदर इमारत डोंगराला लागून होती. एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला रुग्णालय, शाळा, मंदिर परिसर असल्यामुळे या इमारतीतील घर पाहण्यासाठी येणारे नागरिक समाधान व्यक्त करीत होते. मोक्याच्या ठिकाणी भूखंड असल्यामुळे तसेच तोडक कारवाई करताना राजकीय आणि शासकीय अडथळा येवू याकरिता सदर बेकायदा इमारतीवरील तोडक कारवाई विषयी गोपनीयता बाळगण्यात आली होती. २ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता सिडको अधिकारी जेसीबी, पोकलन आणि पोलीस फौजफाटयासह दाखल झाले होते. इमारतीवर तोडक कारवाई करण्यासाठी तीन मशीनची उपलब्धता करुन देण्यात आली होती. सकाळी दहा पूर्वी मोठया प्रमाणात बांधकाम पाडण्यात आले होते. ‘सिडको'ने प्रथमच बेकायदा इमारतीवर पहाटे तोडक कारवाई केल्याचे दिसून आल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु होती.
तीन विकासक एकत्र येवून बेकायदा इमारत बांधण्याचे काम करताना कारवाईसाठी येणाऱ्या आणि मंत्रालयातून मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना इमारतीत मोफत घरे देण्याचे आमिष दाखवून बांधकाम केले जात असल्याने सदर बेकायदा इमारतीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसापासून स्थानिक नागरिकांमध्ये सुरु होती.
खारघर सेक्टर-५ मधील ‘सिडको'च्या राखीव भूखंडावर अनधिकृतपणे उभारण्यात आलेली इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. खारघर परिसरात असलेल्या अन्य अनधिकृत इमारतींवर योग्य वेळी कारवाई केली जाणार आहे. - सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता अधिकारी- सिडको.