नवी मुंबई परिसरात ‘सुक्या मासळी'च्या बेगमीला सुरुवात
वाशी : विकासाच्या ओघात नवी मुंबई शहरातील भातशेती काळाच्या ओघात पडद्याआड झाली. नवी मुंबई शहरात भात पिकवला जात असताना उन्हाच्या झळा सुरु झाल्यावर नवी मुंबई परिसरात सुक्या मासळीच्या बेगमीची लगबग पहायला मिळत होती. आता भले भातशेती नसली तरी मार्च महिना संपल्यावर नवी मुंबई परिसरात सुक्या मासळीच्या खरेदीकडे नागरिकांचा कल वाढत असून, मोठ्या प्रमाणात सुकी मासळी वाळवून व्यवस्थित तिची पावसाळ्यासाठी बेगमी केली जात आहे.
पावसाळ्यात खोल समुद्रात मासेमारीला बंदी असल्याने समुद्रातील मासळी मिळत नाही. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिने मांसाहार प्रेमींना सुक्या मासळीवरच ताव मारावा लागतो. परिणामी उन्हाळी वाळवणाच्या कामात सुक्या मासळीची बेगमी देखील खूप महत्त्वाची समजली जाते. नवी मुंबई शहर समुद्र आणि खाडी किनारपट्टी जवळील परिसर असल्यामुळे येथे अनेक नागरिक घरगुती स्वरुपात मासळी पकडून, सुकवून सुवया मासळीची बेगमी करताना फार पूर्वी पासून पाहायला मिळत आहेत. दिवाळे, करावे, सारसोळे, वाशी, ऐरोली पर्यंत मासेमारी करणारा वर्ग आजही उन्हाळ्यात मासळी सुकविण्याची कामे करताना दिसतो.
खाडीतून कोळंबी पकडून आणून ती व्यवस्थित वाळवून त्याचा पुढील पाच-सहा महिन्यांसाठी साठा केला जातो.पूर्वी ‘कोळंबी'चा साठा मातीच्या बासनात, मडक्यात किंवा लाकडी पेटाऱ्यात केला जात होता. त्यामुळे सुकी मासळी व्यवस्थित टिकते. नवी मुंबई परिसरातील गावोगावी सुक्या मासळीच्या विक्रेत्या देखील मोठ्या प्रमाणात सुका जवळा, सुकट, करंदीपासून केली जाणारी अंबाडी सुकट, वाकट्या, बोंबील, सुकी मांदेली, सुका शिंगाळा, सुका कूपा, खारवलेली सुरमई, सुका खारवट बांगडा आदी सुकी मासळी घेऊन फिरत आहेत. त्यात काही विक्रेत्या या उरण, पनवेल भागातून येत असतात. तर यावर्षी वाढत्या महागाईमुळे सुक्या मासळीचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहेत. सोड्याचे दर प्रतिकिलो जवळपास चारशे रुपयांनी वाढले आहेत. वाकटी, बोंबील दर किलोमागे दीडशे ते दोनशे रुपयांनी वाढले आहेत. अंबाडी सुकट, तेंडली सुकट आणि बारीक जवळा यांचे गेल्यावभाव देखील किलोमागे ५० ते ६० रुपयांनी वाढले आहेत.
जुने दर (प्रतिकिलो)
जवला - ३००/- रुपये
सुकी करंदी - ४५०/- रुपयेे
बोंबील - ६००/- रुपये
बांगडा - २५ /- रुपये (नग)
मांदेली - १६०/- रुपये
सोडे - १,६००/- रुपये
वाकटी - ६००/- रुपये
नवीन दर (प्रतिकिलो)
जवला - ४००/- रुपये
सुकी करंदी -६००/- रुपये
बोंबील - ८००/- रुपये
बांगडा - ३०/- रुपये (नग)
मांदेली - २००/- रुपये
सोडे - २,०००/- रुपये
वाकटी -८००/- रुपये
उन्हात सुकी मासळी सुकवल्याने पावसाळ्यात खराब होत नाही. त्यामुळे उन्हाळ्यातच नागरिक सुक्या मासळीची खरेदी करतात. दरवर्षी सुवया मासळीचे दर थोड्याफार प्रमाणात वाढत असतात. मात्र, दर वाढले तरी देखील ग्राहक सुकी मासळी खरेदी करतात. - रुख्मिणी राऊत, मासळी विक्रेती - नवी मुंबई.