मिरा-भाईंदरचा मुंबई, ठाणेशी तुटला संपर्क
भाईंदर : मिरा-भाईंदर शहरामध्ये १५ ऑगस्ट रोजी रात्रीपासून जोरदार सुरु झालेल्या पावसाने १९ ऑगस्ट रोजी सुध्दा जोर कायम ठेवल्यामुळे काशीमीरा ते मुंबई आणि ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर पाणी साचल्यामुळे दोन्ही मार्गिकेवरील वाहतूक ठप्प झाली. परिणामी, मिरा-भाईंदर शहराचा संपर्क तुटला आहे. शहरात पूरसदृश स्थिती कायम असून १९ ऑगस्ट रोजी सकाळपासून उत्तन येथील पालखाडी पुलावरुन पाणी वाहून जात आहे. तर मूर्धा, मुनशी कंपाऊंड भागातील घरात पाणी शिरले आहे.
१५ ऑगस्ट पासून सुरू झालेल्या पावसाने थोडी सुध्दा विश्रांती घेतलेली नाही. १९ ऑगस्ट रोजी सुध्दा पावसाने जोर कायम ठेवल्यामुळे नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. भाईंदरच्या उत्तन येथील पालखाडी पुलावरुन पाणी वाहून जात आहे, तर पाली चर्च भागातील आणि मूर्धा गावातील घरात पाणी शिरले आहे. तसेच मिरा-रोड येथील मुनशी कंपाऊंड, शांती नगर, हाटकेश, मिरागांव, गांवठाण भागातील घरात पाणी शिरले आहे. मिरा गांवच्या कृष्णस्थळ भागातील वीज पुरवठा बंद झाला आहे.
इंद्रलोक भागात झाड पडण्याची घटना घडली आहे. तर शहरातील इतर भागात पाणी भरण्याची स्थिती १८ ऑगस्ट सारखीच कायम आहे. मिरा-रोड येथील काशीमीरा भागातून जाणारा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग मुंबई, ठाणे, वसई विरारहून थेट गुजरात राज्याकडे जातो. त्याच रस्त्यावर साधारणतः ३ फुट उंच पाणी भरल्यामुळे सर्व मार्गिकेवरील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे मिरा-भाईंदरचा मुंबई, ठाणेशी संपर्क तुटला आहे.