उल्हासनगर मध्ये पहिला बायोगॅस प्रकल्प सुरु
स्वच्छता, ऊर्जा, पर्यावरण रक्षणाचा त्रिसूत्री उपक्रम
उल्हासनगर: पर्यावरण दिन निमित्ताने म्हारळ परिसरातील रिजेन्सी अँटीलिया गृह प्रकल्पात बायोगॅस प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. सदर प्रकल्प उल्हासनगर महापालिका हद्दीतील पहिला बायोगॅस प्रकल्प असून, पर्यावरणपूरक जीवनशैलीचा आदर्श ठरतो आहे.
रिजेन्सी अँटीलिया या गृह प्रकल्पात एकूण १३०० पेक्षा अधिक सदनिका असून त्याच परिसरात २५ गायींची गोशाळा कार्यरत आहे. या गोशाळेमधून निर्माण होणारे शेण आणि अन्य जैविक कचरा प्रकल्पासाठी कच्चा माल म्हणून वापरला जाणार आहे. अशा प्रकारे जैविक कचऱ्याचा पुनर्वापर करुन त्याद्वारे ऊजानिर्मिती होणार आहे. या प्रकल्पामधून दररोज सुमारे २५० घनमीटर मिथेन गॅस तयार होणार आहे. या गॅसचा वापर मुख्यतः परिसरातील विजेचे दिवे पेटविण्यासाठी होणार आहे.
सदर बायोगॅस प्रकल्प ३ मुख्य भागांत विभागलेला आहे. यामध्ये प्रायमरी डिजेस्टर टँक, मध्यवर्ती कक्ष आणि मुख्य डायजेस्टर टाक्या या भागात विभागाला आहे. प्रत्येकी २००० किलो क्षमतेच्या २ टाक्यांमध्ये जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करुन मिथेन गॅस तयार केला जातो. मिथेन गॅस बाजुलाच असलेल्या एका खोलीमध्ये जमवला जातो.
या प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाला आमदार कुमार आयलानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, महेश सुखरामाणी, राम पारवानी, महेश अग्रवाल, उध्दव रुपचंदानी, अनिल बठिजा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर प्रक्रिया मुख्यतः अवायवीय पध्दतीने केली जाते, म्हणजे जिथे ऑक्सिजन नसतो. गोठ्यातील शेण, अन्नाचा उरलेला भाग, भाज्यांचे टाकावू भाग, फळांचे साली, सेंद्रिय किचन वेस्ट वापरतात. कचऱ्याला पाण्याशी मिसळून स्लरी तयार केली जाते. सदर स्लरी डिजेस्टर टाकीमध्ये टाकली जाते, जिथे सूक्ष्मजैविक क्रिया होते. ऑक्सिजनशिवाय काही विशिष्ट जीवाणू स्लरी विघटित करतात आणि त्यातून बायोगॅस तयार होतो. तयार झालेला बायोगॅस गोळा करुन जनरेटरमध्ये वीज निर्मितीसाठी वापरला जाणार आहे. उरलेली स्लरी उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत म्हणून शेतीत वापरता येते. विशेष बाब म्हणजे आता ओला कचरा महापालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवर जाणार नसून कचरा समस्या सोडवण्यासाठी शहरांमध्ये अशा प्रकारचे बायोगॅस प्रकल्प उभे केले पाहिजेत, असे या प्रकल्पाची माहिती देताना अवनी इंटरप्रायजेस कंपनीचे अजित कुडे यांनी सांगितले.
दरम्यान, प्रकल्पाच्या स्थापनेमुळे स्वच्छता, ऊर्जा निर्मिती आणि पर्यावरण संवर्धन असे तीनही उद्देश साध्य होणार आहेत. शहरी भागात अशी संकल्पना राबवणे एक क्रांतिकारी पायरी मानली जात आहे. यामुळे इतर गृह प्रकल्पांसह उल्हासनगर महापालिकेलाही प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी यावेळी केले. ती केवळ ऊर्जा निर्मिती नव्हे, तर पर्यावरण संवर्धनाची जन चळवळ आहे, असे मत आमदार आयलानी यांनी व्यक्त केले.