जीर्ण इमारतीच्या छताचा प्लास्टर कोसळला; २ महिलांसह मुलगा जखमी
भिवंडी : शहरातील पिरानी पाडा परिसरात धोकादायक अवस्थेतील इमारतीचा छताचा प्लास्टर अचानक कोसळल्याने मोठा अपघात घडला. या घटनेत २ महिलांसह १ मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
समद हरुन अन्सारी (१०), मरियम मिरजुद्दीन गोसे (२७) आणि शारीना परवीन (२९) अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत. प्रभाग समिती क्रमांक-२ मधील पिराणी पाडा येथील बिहारी चाळ घर क्र.३९०/१ एकमजली मिळकत जीर्ण अवस्थेत असून या इमारती मधील एका घरातील छताच्या स्लॅबचे प्लास्टर ८ जुलै रोजी सकाळच्या सुमारास कोसळले. सदर प्लास्टर घरातील व्यक्तींवर पडल्याने त्यात सदर घरातील २ महिला आणि १ मुलगा जखमी झाला आहे. या इमारतीमध्ये ८ कुटुंब राहत असून घटनेची माहिती मिळताच प्रभागाचे सहाय्यक आयुक्त माणिक जाधव आपत्कालीन कक्षातील कर्मचारी घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तर शांतीनगर पोलिसांनी सुध्दा अपघातस्थळी दाखल होत जखमींना स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
जखमींपैकी दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याने समद आणि मरियम या दोघांना पुढील उपचारासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. संपूर्ण इमारतीचा विद्युत पुरवठा आणि पाणी पुरवठा खंडीत करुन कुटुंबियांनी इमारत रिकामी करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त माणिक जाधव यांनी दिली.
दरम्यान, शहरातील धोकादायक आणि अनधिकृत इमारतींचा प्रश्न गंभीर असून महापालिका प्रशासनाने त्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा शहरातील धोकादायक इमारत दुर्घटना आणि संभाव्य जीवितहानी टाळता येणे मुश्किल होईल, अशी नागरिकांची मागणी आहे.