महापालिकेचे बस आगार बनले समस्यांचे आगार

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका परिवहन उपक्रमाच्या बस आगारातील अग्निशमन यंत्रे निकामी झाली आहेत. सीसी टीव्ही मॉनिटर स्क्रीन बंद अवस्थेत आहे. चार्जिंग स्टेशन उघड्यावर पडले आहे. त्यामुळे महापालिकेचे बस आगार बनले समस्यांचे आगार बनले असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकाकडे केली आहे. त्यावर सहाय्यक आयुक्त परिवहन यांनी तक्रारीचे तातडीने तपासणी करुन आवश्यक ती दुरुस्ती करावी, असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.

सरकारी पोर्टलवर तसेच महापालिका प्रशासनाकडे फोटोसह दिलेल्या तक्रारीत सामाजिक कार्यकर्ते सचिन जांभळे यांनी नमूद केले आहे की, आगार परिसरात काही ठिकाणी अग्निशमन यंत्र ठेवलेले आहेत. मात्र, सदर सर्व यंत्र निकामी झालेले आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये मोठी दुर्घटना घडू शकते. आगार परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, सर्व्हर रुम किंवा लाईव्ह स्क्रिनिंग मॉनिटर स्क्रिन बंद असल्याने या सीसीटीव्हीचा उद्देश सफल होत नाही. आगार परिसरात परिवहन बसेस साठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. परंतु, या चार्जिंग स्टेशन भोवती सुरक्षा भिंत तसेच सुरक्षा रक्षक सुध्दा नसल्याने अज्ञात व्यक्तीकडून जाणीवपूर्वक असामाजिक कृत्य केले जाण्याची शक्यता आहे. तसेच आगारात कर्मचारी विश्रांतीगृह आहे; मात्र विश्रांती घेण्यासाठी लागणारी कोणतीही साधनसामुग्री उपलब्ध नाही. याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

याचबरोबर परिवहन सेवा सुध्दा अनियमित झाली असल्याची तक्रार अनेक प्रवासी करीत आहेत. परिवहन सेवेच्या अनेक डिझेल बस यांत्रिक बिघाडामुळे दररोज रस्तोरस्ती बंद अवस्थेत उभ्या असतात. तसेच काही ई-बस सुध्दा बंद पडलेल्या असतात. तर इलेक्ट्रिक बस चार्जिंग नसल्यामुळे ठाण्यावरुन कोणताही थांबा न घेता थेट डेपोमध्ये आणल्या जात आहेत. तसेच बसेस पूर्ण चार्ज न करताच पुढे चालविण्यात येतात. या सर्व गोंधळामुळे काही बस मार्गावरील बस दुसऱ्या मार्गावर वळविण्यात येतात त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात.

परिवहन उपक्रमातील बस डेपो आणि इमारती बाबत प्राप्त झालेल्या तक्रारीची तातडीने तपासणी करुन आवश्यक ती दुरुस्ती करावी, असे पत्र सहाय्यक आयुक्त (परिवहन) यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पाठविले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

समृध्दी महामार्ग, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, अटल सेतू मार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी