एपीएमसी फळ बाजारात अस्वच्छतेचा बाजार?

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारातील हापूस आंबा निर्यात होणाऱ्या इमारती जवळच कचऱ्याचे ढीग साचत आहेत. या इमारती समोरील उपहारगृहामध्ये शिजवलेले अन्न उघड्यावर ठेवून एकंदरीत बाजार घटकांच्या आरोग्याशी खेळ मांडला जात असून, यावर एपीएमसी प्रशासन काय कारवाई करणार?, असा प्रश्न एपीएमसी फळ बाजारातील व्यापारी आणि ग्राहक यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.

नवी मुंबई शहरात काही वर्षांपूर्वी ठिकठिकाणी कचरा कुंड्यांची सुविधा उपलब्ध करण्यात होती. परंतु, बहुतांशी ठिकाणी ओला आणि सुका कचरा रस्त्यावरील कचरा कुंडीमध्ये न टाकता रस्त्यावरच अस्ताव्यस्त टाकला जात होता. त्यामुळे रस्त्यावर आणि परिणामी त्या विभागात दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरत होते. नवी मुंबई महापालिका मार्फत स्वच्छता सर्वेक्षण अभियान अंतर्गत गेल्या काही वर्षांपासून नवी मुंबई शहरातील कचराकुंड्या हटविण्यात आलेल्या आहेत. त्याऐवजी आता कचरा वाहून नेण्यासाठी घंटागाडी सुविधा सुरु करण्यात आलेली आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील रस्ते मोकळा श्वास घेत आहेत. मात्र, आजही एपीएमसी बाजार आवारात आणि बाजाराबाहेरील रस्त्यावर कचऱ्याचे ढीग आढळत आहेत.

वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात आता रमजान निमित्ताने मोठ्या प्रमाणावर फळांचा हंगाम सुरु झाला आहे. याशिवाय हापूस आंबा हंगामानेही जोर धरला आहे. त्यामुळे एपीएमसी फळ बाजारात मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होत आहे. मात्र, एपीएमसी फळ बाजारात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य नियोजन होत नसून दोन-तीन दिवस कचऱ्याचे ढीग साचत आहेत. त्यामुळे एपीएमसी फळ बाजार परिसराला घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधी सुटत असल्याने बकालपणा आला आहे. हापूस आंबा निर्यात होणाऱ्या इमारती जवळील कचरा गेल्या काही दिवसांपासून उचलला जात नसल्याने कचरा साचलेला आहे. येथे काचऱ्यासाठी एकही कचरा कुंडी नसल्याने येथे उघडपणे कचरा टाकला जात आहे. त्यामुळे एपीएमसी फळ बाजार परिसरात दुर्गंधी पसरली आहे. एपीएमसी फळ बाजारातील कचऱ्याचे नियोजन एपीएमसी करणार का?,  असा प्रश्न एपीएमसी बाजार घटकांमधून उपस्थित होत आहे.

उपहारगृहात उघड्यावर ठेवलेल्या अन्नपदार्थांनी आरोग्याशी खेळ
एपीएमसी फळ बाजारातील निर्यात भवन इमारती समोर असलेल्या उपहारगृहाला देण्यात आलेल्या जागेव्यतिरिक्त अधिक पटीने जागेचा वापर सुरु आहे. याशिवाय या ठिकाणी उघडपणे शिजवलेला भात टेबलवर टाकण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. याच परिसरात कचऱ्याचे साम्राज्य असल्यामुळे या ठिकाणी माशा तसेच उंदरांचा उपद्रव देखील वाढत आहे. उपहारगृहातील उंदीर आणि माश्या अन्नावर जाऊन बसतात. त्यामुळे एकंदरीत उपहारगृहामध्ये येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. यावर एपीएमसी आणि अन्न औषध प्रशासन कारवाई कधी करणार?, असा प्रश्न या उपहारगृहात येणारे ग्राहक उपस्थित करीत आहेत.

एपीएमसी बाजार आवारातील कचरा नियोजनाबाबतचा विषय येत्या एपीएमसी संचालक मंडळ बैठकीत पटलावर घेण्यात येणार आहे . तसेच उपहारगृहामध्ये उघड्यावर ठेवलेल्या अन्नाबाबत चौकशी करुन अहवाल मागविण्यात येणार आहे. - पी. एल. खंडांगळे, सचिव - मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी), वाशी. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आगरी युवा साहित्यिक सर्वेश तरे यांच्या लग्नात नवा पायंडा