नवी मुंबई गुन्हे शाखेने 55 नागरिकांना मोबाईल फोन केले परत
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या 10 लाख 50 हजार रुपये किमतीच्या 55 मोबाईल फोनचा शोध घेऊन सदर मोबाईल फोन संबंधित नागरिकांना परत केले आहेत. हरवलेले व चोरीला गेलेले मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करुन त्यांचे आभार मानले.
गहाळ झालेल्या मोबाइल फोनचा शोध घेण्याकरीता केंद्र सरकारने सीईआयआर (सेंट्रल इक्वीपमेंट आयडेंटीटी रजिस्टर) हे पोर्टल कार्यान्वित केले आहे. सदर पोर्टलचा वापर करुन नागरीकांच्या हरवलेल्या मोबाइल फोनचा शोध घेण्याच्या सुचना वरिष्ठ अधिकाऱयांकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल शिंदे व त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांकडुन विशेष मोहिम राबविण्यात आली होती.
या शोध मोहिमेत मध्यवर्ती कक्षाने तांत्रिक विश्लेषण करुन नवी मुंबई पोलिस आयुक्तालय हद्दीतून चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा सीईआयआर पोर्टलवरुन आढावा घेऊन त्या मोबाईल फोनचा शोध घेतला. तसेच सीईआयआर पोर्टलचा वापर करुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास केला. या तपासात अनेक मोबाइल फोन भारतातील इतर राज्यात व महाराष्ट्रातील इतर जिह्यामध्ये वापरात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
त्यानंतर देखील मध्यवर्ती कक्षाने अथक प्रयत्न करुन काही ठिकाणी स्थानिक पोलीसांची मदत घेवून एकुण 55 नागरीकांचे चोरीला गेलेले व गहाळ झालेले सुमारे 10 लाख 50 हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. तसेच संबंधित फोन मालकांना सदरचे मोबाईल फोन परत केले आहेत. हरवलेला मोबाईल परत मिळालेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त करुन पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत.