माथाडी-सुरक्षा रक्षक कामगारांचे लाक्षणिक उपोषण
मुंबई : राज्यात माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ ‘माथाडी-सुरक्षा रक्षक कामगार बचाव कृती समिती'च्या वतीने २० मे रोजी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मधील राज्याचे कामगार आयुक्त कार्यालयासमोर ‘कृती समिती'चे अध्यक्ष तथा जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल शासनाकडून तत्काळ घेण्यात आल्यानंतर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘कृती समिती'च्या शिष्टमंडळाची अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली.
विविध माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांच्या राज्य स्तरावरील धोरणात्मक प्रश्नासंदर्भात राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्यासमोर संबंधितांची ‘माथाडी-सुरक्षा रक्षक कायदा बचाव कृती समिती'बरोबर संयुक्त बैठक लावण्याचे आणि माथाडी मंडळाच्या अखत्यारितील दैनंदिन प्रलंबित प्रश्न संबंधित माथाडी मंडळाकडे सादर केल्यानंतर त्याची एक महिन्याच्या आत सोडवणूक करण्याचा, माथाडी बोर्डाच्या अधिकाऱ्यांची कामगार आयुक्त आणि सह-कामगार आयुक्त (माथाडी) यांच्यासमोर ‘कृती समिती'समवेत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन कामगार आयुक्त डॉ. एस. पी. तुम्मोड आणि सह-कामगार आयुक्त (माथाडी) यांनी शिष्टमंडळाला दिले. त्यानंतर ‘माथाडी-सुरक्षा रक्षक कामगार बचाव कृती समिती'ने पुकारलेले आंदोलन स्थगित करण्यात आले.
या आंदोलनामध्ये ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन'चे नेते कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, ‘अखिल भारतीय माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन'चे नेते दिपक रामिष्टे, ‘माथाडी युनियन'चे नेते बळवंतराव पवार, ‘अखिल माथाडी युनियन'चे डी. एस. शिंदे, ‘अखिल भारतीय माथाडी, सुरक्षा रक्षक श्रमजिवी आणि जनरल कामगार युनियन'चे नेते अरुण रांजणे, राजन म्हात्रे, ‘महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियन'च्या नंदाताई भोसले, लक्ष्मणराव भोसले, ‘ट्रान्सपोर्ट ॲण्ड डाँक वर्कर्स युनियन'चे निवृत्ती धुमाळ, ‘महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ'चे पदाधिकारी, सतीशराव जाधव, आदि नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्या कामगारांना आमदार शशिकांत शिंदे, कामगार नेते गुलाबराव जगताप, बळवंतराव पवार, सुभाष लोमटे, राजकुमार घायाळ आणि इतर नेत्यांनी मार्गदर्शन केले.
माथाडी कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने मोठ्या प्रमाणात माथाडी कामगारांना त्यांच्या हक्काच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. माथाडी कामगारांना नोंदीत न करणे, बेकायदेशिररित्या कामावरुन काढलेल्या कामगारांना न्याय न देणे, शासनाचे आदेशाची अंमलबजावणी न करणे, वेळेवर पगार न करणे, वेतनवाढ वेळेत आणि योग्य न करणे, कामगारांना दंड आकारणे, थकबाकी वसुलीला विलंब लावणे, आर.आर.सी. वसुलीसाठी पाठपुरावा न करणे, खाजगी बाजार समित्यांमध्ये कायद्याची अंमलबजावणी न करणे, कापूस फेडरेशन आणि एकाही साखर कारखान्यात कायदा न लावणे, एमआयडीसी मधील ५ टक्के कारखान्यात माथाडी कायद्याची अंमलबजावणी न करणे यासह इतर प्रश्नांचा समावेश आहे.
विविध माथाडी मंडळातील नोंदीत माथाडी कामगारांच्या सदर प्रश्नांचे निवेदन कामगार आयुक्त तुम्मोड यांना ‘कृती समिती'ने सादर केले असून, कामगार आयुक्त, सह-कामगार आयुक्त (माथाडी), विविध माथाडी मंडळाचे चेअरमन आणि सेक्रेटरी यांच्यासमवेत ‘कृती समिती'ची संयुक्त बैठक घ्यावी आणि प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी निवेदनातून ‘कृती समिती'ने केली आहे.