समस्यांच्या विळख्यात पुनाडे धरण
उरण : उरणच्या पूर्व विभागातील ८ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पुनाडे धरणाच्या सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी १८ एप्रिल रोजी आमदार महेश बालदी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचा ‘जलजीवन मिशन'चे अधिकारी, जिल्हा परिषद पाणीपुरवठा अधिकारी, आठगांव कमिटी यांचा समवेत पाहणी दौरा संपन्न झाला.
या पाहणी दरम्यान धरणाची साठवणूक क्षमता, धरणाचा असलेला लिकेज यामुळे लाखो लिटर वाया जात असलेला पाणी याबाबत माहिती घेण्यात आली. तसेच दुरुस्त करण्यात आलेले जलशुध्दीकरण प्रकल्प, गाळाची समस्या अशा विविध समस्याही जाणून घेतल्या. पाझर तलाव म्हणून पुनाडे धरणाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, येथील ८ गावांना पाण्याची समस्या भेडसावत असल्याने आज या धरणावर जलशुध्दीकरण प्रकल्प निर्माण करुन ८ गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, या धरणाच्या लिकेजमुळे येथील गावांना पुरेसे पाणी मिळत नाही. लाखो लिटर पाणी वाया जात आहे. धरणाची गळती थांबली तर या धरणातून संपूर्ण उरण तालुक्याला पाणीपुरवठा होऊ शकतो.
सदर पाहणी दरम्यान आमदर महेश बालदी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या निदर्शनात आल्याने या बंधाऱ्याच्या लिकेज दुरुस्तीसाठी आणि शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होऊ नये यासाठी नाल्याच्या बांधकामासाठी त्वरित अधिकाऱ्यांना इन्स्टीमेट तयार करण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी लागणार निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन आमदार बालदी यांनी दिले आहे.
यावेळी ८ गावांना होत असलेला पाणीपुरवठा गढूळ होत असल्याचे येथील ८ गांव कमिटीने जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आ. महेश बालदी यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच ‘जल जीवन मिशन'ची असलेली संत गतीची कामे यामध्ये विशेष जल शुध्दीकरण प्रकल्प दुरुस्ती, सोलर बसविणे, पाईप लाईन टाकण्याची कामे, पाणी साठवणून कामे अशी सर्व कामे अर्धवट अवस्थेत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत याची थर्ड पार्टी तपासणी केली जाणार असून दोषी आढळल्यास कारवाई केले जाणार असल्याचेही अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी सांगितले.
यावेळी ८ गावांना होत असलेल्या पाण्याच्या समस्या लवकरत लवकर सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना कामाला लावले जाईल आणि त्या सोडवून घेतल्या जातील, असे देखील आमदार महेश बालदी यांनी नमूद केले.
याप्रसंगी जिल्हापरिषद सदस्य अविनाश ठाकूर, उपनगराध्यक्ष रवी भोईर, भाजपा ग्रामीण मंडळ अधिकारी धनेश गावंड, उपाध्यक्ष मुकुंद गावंड, आठ गाव पाणी पुरवठा अध्यक्ष अनामिका म्हात्रे, कृष्णा पाटील, देवेंद्र पाटील, सारडेचे सरपंच रोशन पाटील, उरण गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, जलजीवन मिशन अधिकारी प्रशांत पांढरपट्टे, उपअभियंता पाणीपुरवठा रुपाली म्हात्रे, विस्तार अधिकारी विनोद मिंडे, जल संपदा अधिकारी पारडे, आदि उपस्थित होते.