‘आणीबाणी'च्या कालखंडाविषयी नमुंमपा मुख्यालयात माहितीप्रद छायाचित्र प्रदर्शन
नवी मुंबई : भारतात २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू झाल्याच्या घटनेला ५० वर्षे पूर्ण होत असताना केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सर्वत्र विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून नवी मुंबई महापालिकेच्या वतीनेही वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात २५ जून रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्त विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या भव्यतम पॅसेजमध्ये ‘आणीबाणी'विषयक छायाचित्र प्रदर्शन संपूर्ण महिनाभराच्या कालावधीकरिता ठेवण्यात आलेले आहे. अशाच प्रकारचे प्रदर्शन सीबीडी-बेलापूर येथील महापालिका मुख्यालयातही मांडण्यात आले आहे. मुख्यालयात विविध कामानिमित्त मोठ्या संख्येने येणारे नागरिक या प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी करीत आहेत.
या प्रदर्शनामध्ये भारतात प्राचीन काळापासून सुरु असलेल्या लोकशाही व्यवस्थेची चित्रांकित माहिती तसेच ‘आणीबाणी'च्या काळातील घडामोडी आणि लोकशाही रक्षणासाठी लढणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची माहिती प्रदर्शित करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे लोकशाहीच्या सबलीकरणासाठी सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी उपक्रम, योजना यांचीही माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे.
वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहाप्रमाणेच महापालिका मुख्यालयात तळमजल्यावर प्रदर्शित करण्यात आलेले ‘आणीबाणी'विषयक माहितीपूर्ण छायाचित्र प्रदर्शन २४ जुलैपर्यंत ठेवण्यात येणार असून नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.