काही सखल भाग वगळता नवी मुंबईतील जनजीवन सुरळीत
नवी मुंबई : ‘हवामान विभाग'कडून १९ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला असतानाच मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला होता. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार ‘नमुंमपा'ची आपत्कालीन मदत यंत्रणा सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात मदतीसाठी दक्षतेने कार्यरत असून आयुक्त स्वतः शहरातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी अत्याधुनिक एचडी सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आलेले असून महापालिका मुख्यालयातील अद्ययावत इंटिग्रेटेड कमांड कन्ट्रोल सेंटर द्वारे शहरातील स्थितीवर निरीक्षण आणि नियंत्रण ठेवले जात आहे. आयुक्त डॉ. शिंदे यांनी या नियंत्रण कक्षाला भेट देत विविध विभागातील निरनिराळ्या ठिकाणावरील परिस्थितीची सकाळीच पाहणी करीत संबधितांना तत्पर कार्यवाहीचे निर्देश दिले. १
१८ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० ते १९ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० पर्यंत १८५.०२ मि.मी. इतकी अतिवृष्टी झाली असून १९ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० ते सायं.४.३० पर्यंत ८९.५६ मि.मी. पर्जन्यवृष्टी झालेली आहे. कमी वेळेत मोठया प्रमाणात सातत्याने पर्जन्यवृष्टी झाल्याने शहरातील काही सखल भागात पाणी साचल्याचे निदर्शनास आले. मात्र, त्याठिकाणी अतिरिक्त पाणी उपसा पंप आणि वाहून जाणाऱ्या पाण्यामध्ये वॉटर एन्ट्रीजच्या ठिकाणी जमा झालेले अडथळे दूर करुन प्रवाह वाहता करण्यात आला.
मागील पाच दिवसात १५ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० पर्यंत नवी मुंबईत ५४०.५७ मि.मी. इतक्या मोठया प्रमाणात सातत्याने पर्ज्यन्यवृष्टी झाली असून अशा परिस्थितीतही इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबईतील जनजीवन सुस्थितीत आहे. नवी मुंबईत पाणी साचण्याची ठिकाणे तुरळक असून ती प्रामुख्याने पूर्वेकडील डोंगरामधून येणाऱ्या नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाहात अतिवृष्टीमुळे पाण्याची वाढ होत असल्याने त्या आसपासच्या भागातील आहेत. तसेच नवी मुंबई समुद्रसपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले शहर असल्याने काही सखल भागात भरतीच्या काळात अतिवृष्टी झाल्यास काही प्रमाणात पाणी साचते. मात्र, तुरळक ठिकाणे वगळता शहरामध्ये इतरत्र पाणी साचले नाही.
कोपरखैरणे महापे अंडरपास येथे पाण्यात अडकलेल्या स्कॉर्पिओ वाहन आणि बस मधील ५ व्यक्तींना नमुंमपा अग्निशमन दलाने सुखरुप बाहेर काढले. तुर्भे कृष्णा स्टिल झोपडपट्टी भागात अतिवृष्टीमुळे पाणी भरल्याने तेथील ९० हून अधिक नागरिकांचे बाजुच्या गामी कंपनीमध्ये तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे.
सातत्याने पर्जन्यवृष्टी सुरु असल्याने शहरातील वाहतूक आणि रहदारी काही ठिकाणी संथ गतीने सुरळीत सुरु आहे. तसेच एनएमएमटी बसेसही प्रवासी सेवा पुरवित आहेत.
नवी मुंबई महापालिका कार्यालयातील अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर कार्यालयांमध्ये बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसानंतर सुट्टी जाहीर करण्यात आली. या कर्मचाऱ्यांनी आपले कार्यालयीन कामकाज घरुन ई-ऑफिस प्रणालीद्वारे करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
मोरबे धरणात ८६.९५ मीटर पातळी...
‘नमुंमपा'च्या खालापूर तालुक्यातील मोरबे धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून १९ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० पर्यंत ९८.८० मि.मी. पर्जन्यवृष्टीची नोंद झाली आहे. मोरबे धरणाची कमाल क्षमता ८८ मीटर इतकी असून आत्तापर्यंत ८६.९५ मीटर इतकी धरण पातळी झालेली आहे.
नवी मुंबई महापालिकेची आपत्कालीन मदत यंत्रणा आठही विभाग कार्यालय क्षेत्रात दक्षतेने कार्यरत आहे. तथापि, पावसाची संततधार अतिवृष्टी लक्षात घेऊन तसेच २० ऑगस्ट रोजी ठाणे जिल्ह्याला ऑरेज अलर्ट जाहीर केला असल्याची नोंद घेत नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी ‘नमुंमपा'च्या नजिकच्या विभाग कार्यालयातील आपत्कालीन कक्षाशी अथवा महापालिका मुख्यालयातील मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन केंद्राशी २७५६७०६० /२७५६७०६१ या क्रमांकावर अथवा १८००२२२३०९ /२३१० या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा.
-डॉ. कैलास शिंदे, आयुक्त-नवी मुंबई महापालिका.