सरकारने औरंगजेबाची कबर न काढल्यास बजरंग दल तर्फे कारसेवा आंदोलन

तुर्भे : मोघल बादशहा औरंगजेब याच्या कबरी विरोधात बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारने औरंगजेबाची कबर काढावी, या मागणीची तड लावण्यासाठी बजरंग दल तर्फे वाशी मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये निदर्शने करण्यात आली. दरम्यान, सरकारने येत्या एक महिन्यात औरंगजेबाची कबर न काढल्यास कारसेवा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बजरंग दल तर्फे देण्यात आला आहे.

या आंदोलनात विश्व हिंदू परिषद, मातृशक्ती, दुर्गा वाहिनी या संघटनांचे सर्व कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने शिवभक्त नागरिक सहभागी झाले होते.

‘हिंदू द्वेष्टा असलेल्या, स्वतःच्याच बंधू, बापाचा खून करणाऱ्या औरंगजेब याला या देशाशी, इथल्या संस्कृतीशी, परंपरांशी कुठलीही आत्मीयता नव्हती. धर्मवीर संभाजी महाराज यांची छळून हत्या करणाऱ्या औरंगजेब याचे कुठलेही स्मारक, कबर भारतात असणे म्हणजे एक प्रकारे त्याने केलेल्या अन्यायांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे', असा घणाघात यावेळी ‘विश्व हिंदू परिषद'चे नवी मुंबई जिल्हा मंत्री स्वरुप पाटील यांनी केला.

परकीयांचे कोणतेही नामोनिशान स्वतंत्र भारतात असणे तसेचस्थानिक प्रजेला अत्यंत पिडा देणाऱ्या, अन्यायी, दुराचारी, राष्ट्राचा शत्रू असणाऱ्या औरंग्याची कबर अजून अस्तित्वात असणे हीच एक प्रकारची मानसिक गुलामी आहे, अशी भूमिका यावेळी ‘बजरंग दल'चे नवी मुंबई सहसंयोजक तेजस पाटील यांनी मांडली.

‘वर्तमान राज्य सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर औरंग्याची कबर खणून काढावी. त्याचे कुठलेही अस्तित्व राहू देऊ नये, अन्यथा बजरंग दल तर्फे ‘चलो संभाजीनगर', असा नारा देत कारसेवा आंदोलन करेल', असा इशारा या आंदोलनात ‘बजरंग दल'चे नवी मुंबई सहसंयोजक शंकर संगपाळ यांनी दिला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णांना मिळते वॉर्डच्या गेटवर जेवण