महापालिकेला कचऱ्याच्या डब्यात सापडली सोन्याची खाण
भाईंदर : शहरातील गृहसंकुल आणि सार्वजनिक ठिकाणांवरुन कचरा गोळा करण्यासाठी बसविण्यात आलेले कचऱ्याचे डब्बे खराब झाल्याने नव्याने डबे खरेदी करण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेने ते बाजारभावापेक्षा ७ ते ८ पट अधिक दराने विकत घेऊन १९ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिल्याचे उघडकीस आल्याने महापालिका अधिकाऱ्यांना कचऱ्याच्या डब्यात सोन्याची खाण सापडल्याची चर्चा शहरात सुरु आहे.
शहरातील गृहसंकुल आणि सार्वजनिक ठिकाणावरुन कचरा गोळा करण्यासाठी बसविण्यात आलेले डब्बे खराब झाल्याने ७० हजार रुपये प्रति नग किंमतीचे ५०० डब्बे खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. तसेच ९ लाख ५० हजार रुपये प्रति नग किंमतीचे २१ ऑटोमॅटिक डब्बेही खरेदी करण्यात येणार आहेत. एकूण ३,८८९ डब्ब्यांच्या खरेदीसाठी १९ कोटी रुपयांचा खर्च होणार असून, महापालिकेने या खर्चास मंजुरी दिली आहे.
डब्बे खरेदीसाठी महापालिकेने निविदा प्रसिध्द केली होती. त्यानुसार कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लि. या संस्थेला कंत्राट देऊन ३,८८९ डब्बे खरेदी करण्यात येणार आहेत. कंत्राटदाराने सादर केलेल्या दरानुसार स्टेनलेस स्टील पावडर कोटेड बिन्ससाठी प्रति नग ६६,१८३ रुपये स्टेनलेस स्टील-ॲल्युमिनियम कोटेड बिन्ससाठी ६९,६६८ रुपये तर ऑटोमॅटिक डब्ब्याची किंमत तब्बल ९,३४,५६० रुपये प्रति नग, फायबर डब्ब्याची किंमत ३४,५५१ रुपये प्रति नग अशी नमूद करण्यात आली आहे. या दरांशी तुलना करता समाजमाध्यमांवर आणि विविध व्यावसायिक पोर्टल्सवर उपलब्ध असलेल्या बाजारभावानुसार सदरचे दर ७ ते ८ पट अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे इतक्या महागड्या कचऱ्याच्या डब्बा खरेदीबाबत आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.
सदरचे काम शासन निधीतून असुन या कामाकरिता दरसूचीमध्ये दर नसल्याने विहित पध्दतीचा अवलंब करुन चालू बाजारभावातील दरानुसार दर निश्चित करण्यात आले आणि त्यास तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता घेऊन विहित पध्दतीने शासनाच्या वेबसाईटवर निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्या निविदेमधून किमान दर विचारात घेऊन निविदा मंजुरीचा ठराव करण्यात आलेला आहे. परंतु, याप्रकरणी कोणताही कार्यादेश कंत्राटदारास देण्यात आलेला नाही. निविदेतील दराबाबत पुनश्चः तांत्रिक बाबी तपासून त्यानंतरच निविदेबाबत निर्णय घेण्यात येईल.
-राधाबिनोद शर्मा, आयुक्त-मिरा भाईंदर महापालिका.