मिरा-भाईंदर प्रभाग रचनेला ‘निवडणूक आयोग'ची मान्यता

१५ सप्टेंबर पर्यंत हरकती नोंदवण्याची मुदत

भाईंदर : सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी यांच्यासह मतदार वाट पाहत असलेली निवडणूक जवळ आली असून आता अंतिम टप्प्यात असलेल्या प्रक्रियेतील मिरा-भाईंदर महापालिका प्रभाग रचनेला ‘निवडणूक आयोग'ने मान्यता दिली आहे. यामध्ये नगरसेवकांची संख्या ९५ असून ४ सदस्यांचे प्रभाग असतील. दरम्यान, ‘निवडणूक आयोग'ने १५ सप्टेंबर पर्यंत सूचना-हरकती नोंदवण्यासाठी मुदत दिली आहे.

मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनाने प्रभागरचना तयार करुन ती राज्य सरकारच्या माध्यमातून अंतिम मान्यतेसाठी ‘निवडणूक आयोग'कडे सादर केली होती. या प्रभागरचनेला ‘आयोग'ने ३ सप्टेंबर रोजी मान्यता दिली आहे. आगामी निवडणुकीसाठी २०११ सालची लोकसंख्या गृहित धरली जाणार असून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम ५ च्या तरतुदीखाली ४ सदस्यीय प्रभाग प्रध्दती आणि नगरसेवकांची संख्या ९५ एवढी असणार आहे.

गेल्या वेळच्या प्रभाग पध्दतीत २४ पैकी २३ प्रभाग ४ सदस्यीय आणि एक प्रभाग ३ सदस्यांचा होता. ३ सदस्यांचा प्रभाग उत्तन भागात होता. यावेळी देखील हीच रचना कायम राहाणार आहे. त्यासाठी ‘निवडणूक आयोग'ने १५ सप्टेंबर पर्यंत हरकती नोंदवण्यासाठी मुदत दिली आहे. नागरिकांच्या हरकती-सूचना असल्यास त्या महापालिका आयुक्त यांच्याकडे स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, मुख्य कार्यालय, निवडणूक विभाग, तिसरा मजला, भाईंदर (पश्चिम) येथे १५ सप्टेंबर पर्यंत स्वीकारल्या जातील. त्यानंतर आलेल्या हरकती-सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे ‘निवडणूक आयोग'ने स्पष्ट केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘राष्ट्रीय ओबीसी महासंघ'चे प्रांत कार्यालयासमोर लक्षणीय आंदोलन