नवी मुंबई पोलिसांकडून विघ्नहर्ता पुरस्कारचे वितरण

पनवेल : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय मार्फत दरवर्षी आयोजित केला जाणारा विघ्नहर्ता पुरस्कार वितरण सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. परिमंडळ-३, पनवेल यांच्या वतीने आयोजित सदर सोहळा १९ ऑगस्ट रोजी पनवेल मधील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झाला.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी परिमंडळ-३ पनवेलचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कैलास गावडे उपस्थित होते. याशिवाय पोलीस विभाग आणि महापालिकेतील अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील ‘परीक्षक समिती'कडून परिमंडळातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे निरीक्षण करुन ५ विभागांमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे विजेते घोषित करण्यात आले. विजेत्या मंडळांना विघ्नहर्ता पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात तक्का, पनवेल येथील पारंपारिक बँड पथकाच्या गजरात मंडळांनी आपले पुरस्कार स्वीकारले. यावेळी ‘परीक्षक मंडळ'चे सदस्य आणि पनवेल कोळीवाडा येथील गणपती विसर्जनास मदत करणाऱ्या स्वयंसेवकांचा देखील सत्कार करण्यात आला.

दरम्यान, कार्यक्रमात मान्यवरांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव, सामाजिक उपक्रम, शिस्तबध्द आणि कायदेशीर नियमांचे पालन करुन उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. तर मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना येणाऱ्या अडचणी मांडल्या. त्यावर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

उत्कृष्ट गणेश मूर्तीः
प्रथम - श्री गणेश उत्सव मंडळ स्वामी विवेकानंद, उरण
द्वितीय - श्री गणेश मित्र मंडळ, सेक्टर-२४, कामोठे
उत्कृष्ट कार्यक्रम-सामाजिक उपक्रमः
प्रथम - शंभू मित्र मंडळ, सेक्टर-३५, कामोठे
द्वितीय - गणेश मित्र मंडळ, सेक्टर-१८, खारघर
शिस्तबध्द विसर्जन मिरवणूकः
प्रथम - जय दुर्गा क्रीडा-ग्रामविकास तरुण मंडळ, रोहिंजण, तळोजा
द्वितीय - अभिनव युवक मित्र मंडळ पायोनियर, पनवेल
उत्कृष्ट देखावाः
प्रथम -राजे शिवाजीनगर रहिवासी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, कळंबोली
द्वितीय - एकविरा मित्र मंडळ, तक्का, पनवेल
सर्वोत्कृष्ट गणेश मंडळः
प्रथम - जय हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रिटघर
द्वितीय - अनमोल जीवन वेल्फेअर असोसिएशन, उलवे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मुसळधार पावसाने कल्याण-डोंबिवली जलमय