‘कासार्डी नदी संवर्धन'साठी महापालिकेचा पुढाकार

पनवेल : पनवेल महापालिका मार्फत तळोजा औद्योगिक परिसर आणि गावांना जोडणाऱ्या ‘कासार्डी नदी संवर्धन'साठी कासार्डी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत प्रत्यक्ष पाहणी दौरा १४ मे रोजी आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनी केला.

सदर पाहणी दौऱ्यांवेळी उपायुक्त स्वरुप खारगे, शहर अभियंता संजय कटेकर, उपअभियंता विलास चव्हाण, ‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ'चे डॉ. विक्रांत भालेराव, जलसंपदा उपअभियंता अमित पारळे, सार्वजनिक बांधकाम कनिष्ठ अभियंता मेंगाळ, एमआयडीसी प्रतिनिधी दिलीप बोबडे-पाटील, माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे, आदि उपस्थित होते.

पनवेल महापालिका हद्दीतील तळोजा औद्योगिक परिसर आणि गावांना जोडणाऱ्या ‘कासार्डी नदी संवर्धन'साठी महापालिकेने पाऊले उचलेली आहेत. त्यानुषंगाने आयुक्त चितळे यांनी ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'च्या अधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा करुन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ‘कासार्डी नदी संवर्धन'साठी योग्य ती उपाययोजना करण्याकरिता नियोजनाची जबाबदारी महापालिकेला देण्यात आली आहे. या अनुषंगाने लवकरच आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सदर बैठक महत्वाची होती.

‘कासार्डी नदी संवर्धन'साठी रायगड जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्या आहेत. सदर पत्रानुसार कासार्डी नदी पुनरुज्जीवित करण्यासाठी विविध आस्थापनांसोबत पाहणी दौरा आयोजित करुन प्रत्यक्ष नदी पात्राची पाहणी करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनी सदर नदी पुनरुज्जीवित करण्यासाठी संयुक्तपणे कार्यवाही करताना संबंधित आस्थापनांना विविध निर्देश दिले.

पनवेल महापालिका हद्दीमधील प्रदुषित कासार्डी नदीचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने विविध कंपन्यांकडून नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर देखरेख करुन त्याचे स्क्रीनींग करण्याविषयीचे निर्देश संबधित आस्थापनाना देण्यात आले. गणेश घाट, तोंडरे येथील नदी पात्रात अनधिकृतरित्या कंपनीद्वारे, टँकरने केमिकलयुक्त पाणी, सांडपाणी सोडले जाते. अशा कंपन्या, टँकरवर कारवाई करण्याबाबत ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'ला सूचित करण्यात आले.

गणेश घाट, तोंडरे येथील नदी पात्रात ‘स्मॉल चेन ऑफ बंधारे' बांधण्याबाबत नियोजन करणे, काप्रेचार्य मंदिर, नावडे येथे भरतीच्या वेळी नदीचे पाणी गावामध्ये घुसू नये यासाठी गॅबियन वॉल बांधण्यासाठी नियोजन करण्याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अतिरिवत आयुवत गणेश शेटे यांनी निर्देश दिले.

‘कासार्डी नदी'च्या पूर रेषेबाबत महापालिकेस माहितीस्तव पत्र देणे आणि नदीचा मूळ प्रवाह उन्हाळ्यात देखील प्रवाहीत राहिल या दृष्टीने नदीमधील अडथळे काढून टाकण्याबाबत, तसेच ‘कासार्डी नदी'मधील केमिकलयुक्त पाणी ‘सीईटीपी'ला ट्रान्सफर करून त्यावर प्रक्रिया करणेस्तव नियोजन करणे, एमआयडीसी हद्दीतील रस्त्याच्या बाजुला उभे करण्यात येणाऱ्या टँकरवर कारवाई करण्याबाबत एमआयडीसी आस्थापनांना अतिरिवत आयुक्त शेटे यांनी निर्देश दिले.

गणेश घाट, तोंडरे येथील नदी पात्रात करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याबाबत जलसंपदा विभागास सूचित करण्यात आले. तर कासार्डी नदी पात्रात अनधिकृतरित्या कंपनी, टँकरद्वारे केमिकलयुक्त पाणी, सांडपाणी सोडले जाऊ नये यासाठी ठिकठिकाणी सोलार बेस सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत शेटे यांनी ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'ला निर्देश दिले.

दरम्यान, ‘कासार्डी नदी'चे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने विविध आस्थापनांच्या झालेल्या सदर संयुक्त दौऱ्यामध्ये ‘कासार्डी नदी संवर्धन'बाबत विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करुन संबंधितांना उचित कार्यवाही विहीत मुदतीत करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनी दौऱ्याच्या शेवटी दिले.

याप्रसंगी पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण, ‘टीआयए'चे सतिश शेट्टी, सुनिल पडलानी, प्रभाग अधीक्षक जितेंद्र मढवी, सहाय्यक अभियंता औदुंबर अलाट, सहाय्यक अभियंता एच. एन. सरग, सहाय्यक अभियंता निवृत्ती चंदेवाड, आदि उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘नमुंमपा'ची प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधी मोहीमे सुरुच