टिटवाळा गणेश मंदिर रस्त्यावर भूमीगत मलवाहिन्याचे पाणी रस्त्यावर
कल्याण : ‘केडीएमसी'च्या अ-प्रभाग क्षेत्रातील टिटवाळा स्टेशन ते गणेश मंदिर मुख्य रस्त्यात असणाऱ्या भूमीगत मलनिःस्सारण वाहिन्यांच्या चेंबर मधील पाणी चोकअप झाल्यामुळे रस्त्यावर वाहत आहे. पावसाळा सुरु असून या रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाण्यातून वाटचाल करावी लागत आहे. त्यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
टिटवाळा रेल्वे स्टेशन ते गणेश मंदिर रोड मुख्य रस्त्यावर गेले कित्येक महिने अंडर ग्राऊन्ड ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. मलनिःस्सारण वाहिन्यांमध्ये चोकअप झाल्यामुळे रस्त्यातील चेंबरच्या झाकणातून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असून रस्त्यावरून होणाऱ्या वाहनांची वर्दळ, ये-जा करणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यातून ये-जा करण्याची वेळ प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे आली आहे.
या सांडपाण्यातून होणाऱ्या संभाव्य संसर्गजन्य आजाराला सामोरे जाण्याची वेळ सर्वसामान्य करदात्या नागरिकांवर आली असल्याने याबाबत प्रशासन समस्या कधी मार्गी लावणार? अशी मागणी जोर धरु पाहत आहे.
तर कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना हेच कळत नाही की नक्की चोक अप कुठे झाले, रस्त्याच्या आत मध्ये चेंबर कुठे आहेत याचा पत्ता नाही आणि सदर सर्व मलनिःस्सारण वाहिन्या आरखडा उपलब्ध नसल्यामुळे घडत असावे. कल्याण-डोंबिवली महापालिका भारतातील एकमेव महापालिका असेल जिथे सर्व कामे अनागोंदी पध्दतीने झालेली आहेत. आता सदर ड्रेनेजचे काम आणि रस्त्याची कामे महापालिकेनेच केली. मग केडीएमसीचा बांधकाम विभाग, जनि, मनि, पाणी विभाग एकमेकांमध्ये संवाद समन्वय ठेवत नसल्याने अशी समस्या नेहमी येत असल्याचा आरोप ‘शिवसेना शिंदे गट'चे उपशहरप्रमुख विजय देशेकर यांनी केला आहे. तर सदरचा प्रश्न लवकरच तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.