उल्हास नदी घाटाचे बांधकाम सुरुच
घाटाचे बांधकाम थांबविण्याची सरिता खानचंदानी यांची मागणी
उल्हासनगर : उल्हास नदीच्या पात्रात सुरु असलेल्या बेकायदेशीर घाट बांधकाम थांबवावे, अशी स्पष्ट सूचना जलसंपदा विभागाने नोटीसमार्फत दिली असूनही संबंधितांकडून सदर ठिकाणी काम सुरुच असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे.
उल्हासनगर कॅम्प-१ मधील म्हारळ गावाजवळील रिजेंसी अँटिलिया इमारत संकुलात, आमदार कुमार आयलानी यांच्या निधीतून आणि प्रयत्नांमुळे घाटाचे बांधकाम सुरु आहे. सदरचे काम थांबवण्याबाबत उपविभागीय अधिकारी, जलसंपदा विभाग ठाणे यांनी उल्हासनगर महापालिका आयुक्तांना स्पष्ट नोटीस पाठवली आहे. मात्र, कारवाईच्या अभावामुळे बांधकाम वेगाने सुरु आहे.
‘हिराली फाऊंडेशन'च्या अध्यक्षा सरिता खानचंदानी यांनी यासंदर्भात उल्हासनगर महापालिकेला नोटीस पाठवत घाटाचे काम त्वरित थांबवावे आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, बदलापूरमध्ये उल्हास नदीच्या काठावर ‘सत्संग विहार संस्था'ने केलेल्या उत्खनन प्रकरणात तहसीलदारांनी संस्थेला १० कोटी रुपयांचा दंड ठोठावत तात्काळ भराव काढण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात कर्जत आणि रायगड पाटबंधारे विभागाने कठोर भूमिका घेतली आहे.
त्यानुसार कळवा ठाणे पाटबंधारे विभागानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्वरीत कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. नदी पात्रात मोठ्या प्रमाणात झाडांची तोड, उत्खनन, मातीचा भराव आणि सिमेंटीकरण असे सर्व परवानगीशिवाय सुरु असून सदर प्रकार थांबवण्याची गरज अधोरेखित केली जात आहे.
प्रशासनाने आता तरी जागे व्हावे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने गंभीर अशा या बेकायदेशीर कामावर तात्काळ कारवाई करावी, अशी ग्रामस्थ जोरदार मागणी आहे. या संदर्भात आमदार कुमार आयलानी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.