मालमत्ता कर विभागाची ८ दिवसात २९ कोटींची कर वसुली

पनवेल : पनवेल महापालिका मालमत्ता कर विभागाने १८ जुलै रोजी अभय योजना जाहिर केली असून महापालिकेने गेल्या ८ दिवसात २९ कोटी ५६ लाख रुपयांची कर वसूली केली आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाने नियोजनबध्द पध्दतीने रुपरेषा आखून मालमत्ताकर विभागाचे उपायुक्त स्वरुप खारगे यांच्या नियंत्रणाखाली योग्य उपाययोजना राबवत असल्याने रोज सुमारे ४ कोटी महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा होत आहे.

दरम्यान, चारही प्रभागामध्ये तसेच महापालिका मुख्यालयात नागरिकांच्या मालमत्ता कराविषयीच्या सर्व तक्रारी सोडविण्यावर भर दिला जात आहे. तसेच नागरिकांच्या मालमत्ताकर बिलामधील दुरुस्ती मालमत्ता कर विभाग तात्काळ करून देत आहेत. यासाठी सुट्टीच्या दिवशी शनिवार आणि रविवार देखील महापालिकेची कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या बिलाबाबतच्या शंकेचे निरसन करून आपला मालमत्ता कर भरुन पनवेलच्या विकासास हातभार लावावा, असे आवाहन महापालिका तर्फे करण्यात आले आहे.

पनवेल महापालिकेने मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देण्याबाबत अभय योजना सुरु केली आहे. या योजनेचे ४ महत्वाचे टप्पे आहेत. यामध्ये प्रामुख्याने १८ जुलै ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत संपूर्ण मालमत्ताकर एकरकमी भरल्यास शास्तीमध्ये ९० टक्के सूट मिळणार आहे. तसेच १६ ते ३१ ऑगस्ट या कालाधीत संपूर्ण  मालमत्ताकर एकरकमी भरल्यास शास्तीमध्ये ७५ टक्के सूट मिळणार असून या पुढील काळात म्हणजे १ ते १० सप्टेंबर कालावधीत संपूर्ण मालमत्ताकर एकरकमी भरल्यास शास्तीमध्ये ५० टक्के सूट मिळेल. तसेच ११ ते २० सप्टेंबर या कालाधीत संपूर्ण  मालमत्ताकर एकरकमी भरल्यास असलेल्या शास्तीमध्ये २५ टक्के सूट मिळणार आहे. अभय योजना केवळ एकवेळची विशेष आणि अंतिम बाब म्हणून जाहीर करण्यात आली आहे.

ऑनलाईन भरल्यास २ टक्के सलवत...
पनवेल महानगरपालिकेच्या वेबसाईट, PMC TAX APP अथवा पनवेल कनेक्ट ॲपद्वारे नागरिकांनी  मालमत्ता कर ऑनलाईन भरल्यास त्यांना २ टक्के सवलत मिळेल. तसेच चालू वर्षाचा म्हणजे २०२५-२६ चा कर ३१ जुलैपर्यंत भरल्यास त्यांना या करामध्ये ५ टक्के सूट मिळेल. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर कर भरणा करुन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मालमत्ता कर उपायुक्त स्वरुप खारगे यांनी केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन