आक्कादेवी धरण परिसरात पर्यटकांची गर्दी
उरण : उरण तालुक्यातील चिरनेर येथील आक्कादेवी धरण यंदा पहिल्या पावसातच तुडुंब भरले आहे. त्यामुळे २२ जून रोजी सुट्टी दिनी आक्कादेवी धरणातील ओसंडून वाहणाऱ्या पाण्याखाली भिजण्याची मजा घेण्यासाठी तरुणाईने मोठी गर्दी केली होती. उरण तालुक्यात मागील आठवडाभर समाधानकारक पाऊस झाल्याने दरवर्षी जुलै महिन्यात भरणारे आक्कादेवी धरण यंदा जून महिन्याच्या मध्यावरच तुडुंब भरुन ओसंडून वाहत आहे. त्यामुळे छोटे आक्कादेवी धरण पर्यटकांसाठी पर्वणी ठरली आहे.
उरण,पनवेल आणि पेण तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात पावसाची दमदार बरसात झाल्याने चिरनेर येथील आक्कादेवी येथील उत्तर,पूर्व आणि दक्षिण या तीन दिशांना असलेल्या उंच डोंगराच्या कुशीत असलेल्या आक्कादेवी धरणातील पाणी पश्चिम दिशेने ओसंडून वाहत आहे. २५ सप्टेंबर १९३० रोजीच्या चिरनेर जंगल सत्याग्रहाची साक्ष देणाऱ्या आक्कदेवीच्या माळरानावर पावसाळ्यात येणाऱ्या पर्यटकांची रेलचेल वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
मागील काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून चार जणांना आपला जीव गमवावा लागला असून, ८० ते ८५ पर्यटक जखमी झाल्याची घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र धरणे, धबधबे या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, उरण, नवी मुंबई,पनवेल पासून जवळच्या अंतरावर असलेल्या चिरनेर येथील आक्कादेवी धरणावर पर्यटकांना धोका नसल्याने या धरणातील पाण्याखाली भिजण्याची मजा घेण्यासाठी पर्यटक पसंती देत आहेत.
पावसाळ्यात तीन डोंगराच्या बाजूने हिरवीगार शाल पांघरलेल्या तीन दिशांच्या डोंगरामध्ये रिमझिम बरसणारा पाऊस आणि उंचावरुन फेसाळत धबधब्याचे पडणारे थंडगार पाणी अंगावर झेलण्यासाठी पर्यटक सुट्टी दिनी आक्कादेवी धरणातील ओसंडून वाहणाऱ्या पाण्याखाली भिजण्याची मजा घेण्यासाठी अधिक पसंती देत आहेत.