अपर तहसील कार्यालयावर ‘शेकाप'तर्फे मोर्चा

नवीन पनवेल : कासारभट येथील शेतकऱ्याला न्याय मिळत नसल्याने ‘शेकाप'तर्फे ८ ऑगस्ट रोजी अपर तहसील कार्यालयावर माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तत्कालीन तलाठी आणि तत्कालीन मंडळ अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि शेतकऱ्याचा सातबारा जिवंत करण्यात यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि ‘शेकाप'चे रायगड जिल्हा शेतकरी सभा जिल्हाध्यक्ष अनिल ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कासारभट येथील भोंडकर परिवारातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. साई येथील १०८ गुंठे जमीन तत्कालीन तलाठी आणि तत्कालीन मंडळ अधिकारी यांनी बनावट कागदपत्रे बनवून आणि बनावट सावकार उभे करुन जमीन हडप केल्याचा या दोघांवर आरोप आहे. भोंडकर या शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या तत्कालीन तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच सातबारावर पुन्हा भोंडकर कुटुंबियांची नावे लागण्यात यावी, अशा मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी अपर तहसीलदार यांनी याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला असल्याचे सांगितले. यावेळी सभापती नारायण घरत, महापालिका जिल्हा चिटणीस प्रकाश म्हात्रे, तालुका चिटणीस पनवेल विधानसभा तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, तालुका चिटणीस राजेश केणी, ‘काँग्रेस'चे महापालिका जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, महापालिका महिला जिल्हाध्यक्ष हर्षला तांबोळी, शेकाप सहचिटणीस तेजस्विनी घरत, पुरोगामी जिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील तसेच अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

न्यायालयीन वास्तू न्याय, समता, लोकशाही मुल्यांचे प्रतिबिंब -न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी