नवी मुंबई महापालिकेस पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘हरित यशोगाथा सर्वांगीण उत्कृष्टता’ पुरस्कार

नवी मुंबई : पाणी, सांडपाणी, घनकचरा आणि पुर्नवापर यासारख्या महत्वाच्या विषयाशी संबधीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील IFAT इंडिया २०२५ हे विशेष प्रदर्शन १४ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत मुंबईत आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनात 50 पेक्षा जास्त देशांतील 500 पेक्षा अधिक उत्पादक सहभागी झाले आहेत.

या आंतरराष्ट्रीय मंचावर नवी मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण संवर्धन, सांडपाणी पुनर्वापर, घनकचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकासासाठीच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ‘हरित यशोगाथा सन्मान 2025’ हा पुरस्कार ‘सर्वांगीण उत्कृष्टता (All Rounder)’ या श्रेणीमध्ये प्रदान करण्यात आला. नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी माझी वसुंधरा अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘थिमॅटिक क्षेत्रातील सर्वांगीण उत्कृष्टता पुरस्कार’ स्विकारला.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज संस्था, मुंबई यांच्या वतीने हा पुरस्कार सन्मानचिन्ह व गौरवपत्र स्वरुपात प्रदान करण्यात आला असून याप्रसंगी आयुक्त महोदयांसमवेत अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे व उपअभियंता स्वप्निल देसाई व्यासपीठावर उपस्थित होते.

नवी मुंबई महापालिकेला पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल लाभलेला हा मानाचा पुरस्कार नवी मुंबईच्या सर्वांगीण पर्यावरणीय कार्याची आणि शाश्वत व हरित शहर घडविण्याच्या वचनबद्धतेची दखल घेणारा असल्याचे सांगत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी यामध्ये विविध उपक्रमात पर्यावरणशील दृष्टीकोन जपत नवी मुंबईकर नागरिकांनी दिलेल्या सक्रीय योगदानाचा महत्वाचा वाटा असल्याचे सांगून सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आहे.     

पर्यावरण तंत्रज्ञान आणि शाश्वत उपायांशी संबंधित उत्पादकांना एकत्र आणणे, अत्याधुनिक स्वरुपाचे नवीन तंत्रज्ञान सादर करणे आणि परस्पर सहकार्याच्या संधी निर्माण करणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. IFAT इंडिया या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात जगभरातील ५० पेक्षा अधिक देशांतील उत्पादक तसेच विविध देशांमधील सरकारी अधिकारी यांनी सहभाग नोंदविला. जल व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, घनकचरा व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पर्यावरणीय शाश्वततेवरील अत्याधुनिक तंत्रज्ञान व उपाययोजना या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.

या नामांकित प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याचा बहुमान नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांना लाभला असून याप्रसंगी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे महासंचालक डॉ.जयराज पाठक, युनिसेफचे प्रतिनिधी संजय सिंह, महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाचे मिशन संचालक  सुधाकर बोबडे, राज्य हवामान कृती संचालनालयाचे संचालक अभिजित घोरपडे, मिरा भाईंदर महापालिका आयुक्त  राधाबिनोद शर्मा व इतर मान्यवर उपस्थित होते.

या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये नवी मुंबई महापालिकेची घनकचरा व्यवस्थापन प्रणाली आणि पाणीपुरवठा व्यवस्थापन या विषयीच्या उत्तम कामगिरीचे प्रदर्शन करणारा स्टॉल लावण्यात आला असून याठिकाणी जगभरातील प्रदर्शक भेट देऊन माहिती घेत आहेत व प्रशंसा करीत आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ईटीसी केंद्रातील दिव्यांग विद्यार्थी-पालकांतर्फे दिवाळी वस्तू-फराळ प्रदर्शन