१८ बोगस डॉक्टरांविरुध्द गुन्हा
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने जिल्हाधिकारी-जिल्हादंडाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्याकडील प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने शहरातील बोगस डॉक्टरांच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील एकूण २६ डॉक्टरांचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यातील १८ डॉक्टरांचे शैक्षणिक आणि इतर प्रमाणपत्रे बोगस आढळल्याने त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, उर्वरित बोगस डॉक्टरांविरुध्द कारवाई सुरु आहे.
उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा आणि पथकाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील २६ डॉक्टरांपैकी १८ बोगस डॉक्टरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उर्वरित ८ डॉक्टरांपैकी ३ डॉक्टर महाराष्ट्र कौन्सिल यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. ४ डॉक्टरांची पाहणी केली असता नमूद ठिकाणी त्यांचे क्लिनीक बंद आहे, तर १ डॉक्टर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात येत असल्याने या डॉवटर विरोधात ‘केडीएमसी'मार्फत कार्यवाही करण्यात आलेली आहे, असे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आलेे.
उल्हासनगर क्र.४ परिसरातील पेन्सिल फॅक्टरी जवळ असलेल्या महादेव हेल्थ सेंटरचे डॉ. प्रदीप कछवानी, डॉ. संदीप कछवानी, डॉ. जयदीप कछवानी, याच परिसरात एका क्लिनीक मधील डॉ. दुबे, राम सर्जिकल या क्लिनिकचे डॉ. राम भोईर, ‘जीवदया चारिटेबल ट्रस्ट'चे डॉ. जगदीश करीरा, व्हीटीसी मैदानाजवळ असलेल्या ‘लीलावती क्लिनीक'चे डॉ. श्रीवास्तव, आर. जी. एस. स्कुल जवळ असलेल्या ‘साईबाबा विलनीक'चे डॉ. जे. एल. सचदेव, डॉ. जेठा, डॉ. राजू, डॉ. जे. पी. मिश्रा, आशेळे गाव परिसरातील ‘साई वेद क्लिनीक'चे डॉ. अनिल रतन निकाळजे, एसएसटी कॉलेज जवळील ‘साई क्लिनीक'चे डॉ. कुमावत, सुभाष टेकडी परिसरातील डॉ. सुनील पाटील, नेताजी चौक परिसरातील ‘श्रेयस क्लिनीक'चे डॉ. दीपक सजनानी, हिललाईन पोलीस ठाण्यासमोर असलेल्या ‘क्लिनीक'चे डॉ. शेवरमानी, उल्हासनगर-५ येथील आकाश कॉलनी परिसरातील डॉ. अशोक भाटिया, डॉ. सिंग, डॉ. गुप्ता, डॉ. निलेश दुतोंडे, डॉ. बल्लू या बोगस डॉक्टरांविरोधात महापालिकेने कारवाई केली असून त्यांच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांनी बेकायदेशीर डॉक्टरांकडून उपचार घेवू नयेत. संशयास्पद वैद्यकिय व्यवसायाबाबत त्वरित महापालिका प्रशासनाला कळवावे. तसेच वैध वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांनी आवश्यक परवानग्या अद्ययावत ठेवाव्यात, अन्यथा त्यांच्या विरोधात कठोर कार्यवाही करण्यात येईल.
-मनीषा आव्हाळे, आयुक्त-उल्हासनगर महापालिका.