पोलीस असल्याची बतावणी करुन ३२ लाखांची लूट
नवी मुंबई : पोलीस असल्याचा बनाव करत जुईनगर येथील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे डिपॉझिट करण्यासाठी गेलेल्या तरुणाजवळची ३१ लाखांहून अधिकची रोख रक्कम जबरदस्तीने लुटून फरार झालेल्या टोळीला अवघ्या ३६ तासात अटक करण्याची कामगिरी सानपाडा पोलिसांनी केली आहे. फक्त १ पोलीस अधिकारी आणि ४ अंमलदार यांच्या तपास पथकाने बेंगळुरु (कर्नाटक) येथून या टोळीतील ८ आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून ३० लाखांहून अधिक रक्कम आणि इतर मुद्देमाल हस्तगत केला आहे.
३१ मे रोजी सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास मोहम्मद रमीस अब्दुल हमीद ईदवलथ (२५) नामक तरुण एसबीआय बँकेच्या जुईनगर शाखेतील एटीएममध्ये ३१ लाख ७३ हजार रुपयांची रोख रक्कम डिपॉझिट करण्यासाठी गेला होता. यावेळी पोलीस असल्याची बतावणी करत सदर एटीएममध्ये घुसलेल्या टोळीने मोहम्मद रमीस याला मारुती आर्टिगा कार मध्ये जबरदस्तीने बसवले. त्यानंतर या टोळीने त्याला मारहाण आणि दमदाटी करत त्याच्याजवळ असलेली ३१ लाख ७३ हजाराची रोख रक्कम लुटून त्याला पामबीच मार्गावर सोडून पळ काढला होता.
याबाबत सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल मुंडे पोलीस हवालदार सुनिल चव्हाण, श्रीकांत नार्वेकर, संतोष बडे, संदिप पवार पोलीस कॉन्स्टेबल अमोल भोसले, गोरक्षनाथ गायकवाड आदिंचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने तांत्रिक तपासाद्वारे या गुन्ह्यातील कारचा मागोवा घेत कार चालकाला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीनुसार सदरचा गुन्हा करणाऱ्या टोळीने केरळ मधील सायबर पोलीस असल्याचे सांगून त्याची कार घेतल्याचे आणि पुन्हा सानपाडा हायवे येथे कार सोडून दिल्याचे सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी सानपाडा हायवे ब्रिजजवळच्या लॉजची तपासणी केली. त्यानंतर आरोपी बेंगळुरु, कर्नाटक येथे पळून गेल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांचे पथक बंगळुरु येथे रवाना करण्यात आले. त्यानंतर तपास पथकाने सदर भागातील जवळपास ५०० लॉजस्ची तपासणी करुन बेंगळुरु येथील उप्परस्पेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ८ आरोपींचा शोध घेऊन त्यांना ३६ तासात अटक केली. तसेच त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन्स, मारुती आर्टिगा कार आणि बँक खात्यांमधील ठेव रक्कम असा एकूण ३० लाख ४८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अटक आरोपींमध्ये थानसीर हमसा (२६), निजास मोईन (२७),जॉनसन सन्नी (४५), अन्वर माहीन बाशा (२५), फासील कासीम (३०), मोहम्मद साबीत अश्रफ (२५), फसील कासीम (२८), फासील अब्दुल रेहमान (३१) या ८ जणांचा समावेश असून ते तामिळनाडू आणि केरळ मधील आहेत.