रॅपिडो बाईकवर कारवाईची मागणी
कल्याण : अवैध प्रवासी वाहतूक रॅपिडो बाईक विरोधात रिक्षा चालकांमध्ये प्रंचड असंतोष असून अवैध रॅपिडो बाईक प्रवासी वाहतुकीवर तातडीने कारवाई करा अन्यथा अवैध प्रवासी वाहतूक करणारे खाजगी बाईक चालक आणि रिक्षा चालकांमध्ये आपआपसात वाद निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत ‘रिक्षा-टॅक्सी चालक-मालक असोसिएशन'चे अध्यक्ष प्रणव पेणकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कल्याण उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात अवैधरित्या रॅपिडो बाईक प्रवासी वाहतूक करीत आहेत. रिक्षा चालकांचा रॅपिडो बाईक प्रवासी वाहतुकीला तीव्र विरोध आहे. शासनाने खुले केलेले नवीन रिक्षा-टॅक्सी परवाने वाटप रिक्षा संघटनांनी मागणी करुनही परिवहन प्रशासनाने बंद केलेले नाही. रिक्षा-टॅक्सी परवाने वाटप खुले असल्याने रिक्षा, टॅक्सी यांची संख्या भरमसाठ वाढलेली आहे. सार्वजनिक प्रवासी वाहतुक क्षेत्रात इतर पर्यायी प्रवासी वाहतूक करणारी वाहने आणि प्रचंड प्रमाणात वाढलेल्या रिक्षा, टॅक्सी यांची संख्या यामुळे जीवघेणी स्पर्धा निर्माण होऊन रिक्षा चालकांच्या व्यवसाय धंद्यावर विपरीत परिणाम होऊन त्यांच्या उत्पन्नात घट झाली आहे.
विविध कारणास्तव रिक्षा चालकांना उदरनिर्वाह करणे मुश्किल झाले आहे. त्यातच अवैध बाइक प्रवासी वाहतूक यामुळे उपासमारीची वेळ येईल, अशी भिती रिक्षा चालकांमध्ये आहे. रिक्षा संघटनाचा बाईक प्रवासी वाहतूक करण्यास विरोध आहे. विधानभवनात पावसाळी अधिवेशनात रॅपिडो बाईक प्रवासी वाहतूक परवानगी बाबत चर्चा आणि प्रश्न उपस्थित झाला असता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शासनाने रॅपिडो बाईकला प्रवासी वाहतुकीची परवानगी दिलेली नाही, असे स्पष्ट केले आहे. परवानगी नसताना राजरोसपणे अवैधरित्या रॅपिडो बाईक प्रवासी वाहतूक सुरुच आहे.
त्यामुळे कल्याण उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांना ‘रिक्षा-टॅक्सी चालक-मालक असोसिएशन'चे अध्यक्ष प्रणव पेणकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन दिले. निवेदनात अवैधरित्या रॅपिडो बाईक प्रवासी वाहतूक स्वंतत्र विशेष वाहन तपासणीस निरीक्षक यांचे पथक नेमून ठोस कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी जॉन कॅलिमीनो, संतोष नवले, जितेद्र पवार, अविनाश गायकवाड, डोंबिवली आणि उल्हासनगर शहर रिक्षा संघटना शेखर जोशी, उदय शेट्टी, गजानन पाटील, मिन्टी चौव्हाण, विलास चौधरी, काका मढवी, वसंत पाटील, विजय डफळ, बापु चतुर, बंडु वाडेकर, सुभाष चव्हाण, अविनाश पाटील, आदि पदाधिकारी उपस्थित होते.