ईटीसी केंद्रातील दिव्यांग विद्यार्थी-पालकांतर्फे दिवाळी वस्तू-फराळ प्रदर्शन

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या ईटीसी दिव्यांग शिक्षण प्रशिक्षण-सुविधा केंद्रामार्फत विविध उपक्रमांच्या माध्यमातून दिव्यांग सक्षमीकरणावर भर देण्यात येत असतो. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग विद्यार्थी, व्यक्ती आणि दिव्यांग व्यक्तींचे पालक यांनी दिवाळी सणानिमित्त बनविलेल्या विविध उपयोगी वस्तू आणि साहित्य तसेच दिवाळी फराळ यांच्या प्रदर्शनाचा अभिनव उपक्रम महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात येतो.

ईटीसी केंद्रामार्फत यावर्षीही नवी मुंबई महापालिका मुख्यालयामध्ये तळमजल्यावर आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांगांनी आणि त्यांच्या पालकांनी निर्मिलेल्या विविध वस्तुंच्या आणि दिवाळी फराळाच्या प्रदर्शन-विक्रीच्या स्टॉलला मोठ्या संख्येने महापालिका अधिकारी, कर्मचारी तसेच मुख्यालयात येणाऱ्या अभ्यागत नागरिकांनी भेट देत त्यांना प्रोत्साहित केले.

अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी प्रशासन विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे, मुख्य लेखा-वित्त अधिकारी  सत्यवान उबाळे, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. अजय गडदे, क्रीडा-सांस्कृतिक कार्य विभाग उपायुक्त अभिलाषा पाटील यांच्यासह या प्रदर्शनाला भेट देत दिव्यांग विद्यार्थी, व्यक्ती आणि त्यांचे पालक यांचे कौतुक केले. त्याचप्रमाणे दिवाळी सणाला पूरक वस्तू आणि फराळ यांची खरेदीही अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात करुन त्यांना प्रोत्साहित केले.

दिव्यांग विद्यार्थी आणि पालक यांच्या अंगभूत कलागुणांना उत्तेजन मिळावे. तसेच त्यामधून त्यांना प्रोत्साहन मिळून हातभारही लागावा याकरीता सदर अभिनव उपक्रम प्रत्येक वर्षी ईटीसी केंद्रामार्फत राबविला जात आहे. या उपक्रमाला मिळणारा उत्तम प्रतिसाद दिव्यांगांना आनंद देणारा आणि केलेल्या कामाचे समाधान देणारा असल्याचे मत ईटीसी केंद्र संचालक सहा.आयुक्त अनुराधा बाबर यांनी व्यक्त केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बळीराजाकडून भात कापणीला सुरुवात