‘नमुंमपा'ची मालमत्ताकर बिले आता ऑनलाईन उपलब्ध

बिल वाटपासाठी बचत गटांचा सहभाग

नवी मुंबई ; नवी मुंबई महापालिकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ८२६ कोटी इतका आत्तापर्यंतचा सर्वाधिक मालमत्ताकर संकलित केला आहे. यापुढील आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मालमत्ताकर वसुलीचे १२०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवले असून सदर उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिकेने नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होताच विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत.

या अनुषंगाने महापालिका आयुवत डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ताकर देयक वाटप प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. कर देयके नागरिकांपर्यंत वेळेवर पोहोचविण्यासाठी आधुनिक प्रणालीचा वापर सुरू केला आहे. या माध्यमातून  शहराचा विकास अधिक सक्षमतने करण्याचा दृढ निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. यातील एक महत्वाचा बदल म्हणजे आर्थिक वर्ष २०२५-२०२६ पासून वार्षिक मालमत्ताकर देयाकांचे वाटप वर्षातून एकदाच केले जाणार आहे. तसेच या नवीन आर्थिक वर्षात मालमत्ताकर भरणाऱ्यांसाठी खास प्रोत्साहन सवलत (अर्ली बर्ड स्कीम) जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय मालमत्ताकर देयकांचे वितरण करण्यासाठी बचत गटांच्या महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मालमत्ताकर बिले आता ऑनलाईन उपलब्ध...

‘नमुंमपा'ने आर्थिक वर्ष २०२५-२६ ची मालमत्ताकर बिले आता ऑनलाईन उपलब्ध करुन दिली आहेत. नागरिकांना  आपले  कराचे बील घरबसल्या, कुठेही आणि केव्हाही पाहता व भरता यावे यादृष्टीने महापालिकेच्या www.nmmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तसेच ‘MY NMMC - माझी नवी मुंबई या ॲपवर  मालमत्ताकर बिले उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. नागरिकांनी आपले मालमत्ताकर बिल ३० जून २०२५ पर्यंत  भरल्यास बिलातील सामान्य करावर १० टक्के सवलतीचा लाभ मिळवता येणार आहे.

वार्षिकमालमत्ताकर देयकांचे तातडीने वाटप...

साडेतीन लाखांपेक्षा जास्त मालमत्ताधारक असणाऱ्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रात २०२४-२०२५ पर्यंत ६ महिन्यातून एकदा याप्रमाणे वर्षातून दोनदा घरपोच कर देयके वाटली जात होती. यामध्ये मालमत्ताकर विभागाकडे असणारा मोजका कर्मचारी वर्ग यामुळे देयके वाटपास काहीसा विलंब होत होता. परिणामी, मालमत्ताकर देयके नागरिकांपर्यंत उशीरा पोहोचून त्याचा परिणाम कर थकबाकी राहण्याकडे व्हायचा. सदर प्रकार टाळण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाच्या मदतीने नवी मुंबईमधील सर्व मालमत्ताकर देयाकांचे वाटप यंदा लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहे. त्यानुसार नव्या वित्तीय वर्षापासून संपूर्ण वर्षात एकदाच मालमत्ताकर देयकांचे वाटप सुनियोजित रितीने गतीमानतेने  केले जाणार आहे.

देयक वाटपासाठी बचत गटांची मदत...
विहित मुदतीत मालमत्ताकर देयकांचे वाटप करणे तसेच मालमत्ताकर विभागाच्या कर सवलतीच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी चांगला लोकसंपर्क असणाऱ्या कुशल अतिरिक्त मनुष्यबळाच्या मदतीची गरज लक्षात घेत नवी मुंबई महापालिका मालमत्ताकर विभाग महानगरपालिका क्षेत्रातील बचत गटांची मदत घेत आहे.
आपले बचत गटाचे काम सांभाळून मालमत्ताकर विभागासाठी काम करणाऱ्या या महिलांना महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी मालमत्ताकर देयकांच्या वाटपासाठी प्रवेश देऊन सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

मालमत्तेला आपला मोबईल नंबर लिंक करा...
बचत गटाच्या महिला जेव्हा बिल वाटपासाठी येतील तेव्हा त्यांना मालमत्ताधारक नागरिकांनी आपले मोबाईल नंबर आणि  इमेल आयडी त्यांना अवश्य द्यावेत. जेणेकरुन सदर नंबर नागरिकांच्या मालमत्तेला जोडता येतील आणि पुढील मालमत्ताकर बिले एसएमएस संदेशाद्वारेही मिळू शकतील. नागरिक आपला मोबाईल नंबर आपल्या मालमत्तेला स्वतःही संलग्न करू शकतात. त्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन QR CODE स्कॅन करावा आणि संबंधित माहिती भरावी, असेही आवाहन आहे.

ऑनलाईन कर भरणा सुविधा...
मालमत्ताकर भरणा करणे सहज आणि सुलभ व्हावे, याकरिता भारत बिल पेमेंट सिस्टम अशी नवीन प्रणाली सुरू करण्यात आली असून यामध्ये ऑनलाईन बँकींग, युपीआय, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड, मोबाईल वॉलेटस्‌ यासारखे विविध प्रकार, सूची उपलब्ध आहेत. नागरिक महापालिकेच्या वेबसाईटवरुन तसेच My NMMC - माझी नवी मुंबई या ॲपवरुन घरबसल्या करभरणा करू शकतात. या माध्यमांच्या वापरामुळे मालमत्ताधारकांना त्यांच्या सोयीप्रमाणे कुठूनही ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कराचा भरणा करता येणार असून त्यांना कराचा भरणा केलेली पावती तात्काळ उपलब्ध होणार आहे.

एक वर्ष, एक बिल अशी नवी प्रणाली, कर बिलांना केवायसी जोडणे, मालमत्ताकर बिलांची ऑनलाईन उपलब्धता, कर भरण्याच्या डिजीटल पध्दतींचा प्रभावी वापर आणि बिल वाटपात बचत गटांच्या महिलांचा सहभाग असेे बदल करवसूली प्रणाली नागरिकांना सहजसोपी करण्याप्रमाणेच करवसुलीला नियोजनबध्दता आणि गतीमानता प्रदान करणारे आहेत. नागरिकांनी बिल वितरणासाठी येणाऱ्या बचत गटांच्या महिलांना सहकार्य करावे आणि ३० जून पूर्वी कर भरणा करुन बिलात सामान्य करावर जाहीर केलेल्या १० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा.

-डॉ. कैलास शिंदे, आयुक्त-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई मधील नाल्यांमध्ये अजूनही गाळ?