करावे गावातील स्मशानभूमीची पुरती दुरवस्था
वाशी : करावे गावातील स्मशानभूमीची सध्या पुरती दुरवस्था झाली असून, या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या स्मशानभूमीची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेना (उबाठा) तर्फे नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
करावे गावात असलेल्या स्मशानभूमी मधील अग्निसंस्कार करण्याच्या ठिकाणी चितेच्या लोखंडी सांगाड्याच्या बाजूला बांधण्यात आलेले सिमेंटचे खांब जुने आणि जिंर्ण झाले आहेत. काही ठिकाणी तर आत मधील गंजलेले स्टील संपूर्णपणे नष्ट झालेले दिसून येत आहे. छताचे सिमेंट (स्लॅब) निखळून गंजलेल्या सळ्या दिसत आहेत. याशिवाय सिमेंट थराचा काही भाग खाली पडण्याच्या स्थितीला आला असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अंतिमसंस्कार समयी दुर्दैवाने कुणाच्या डोक्यावर सिमेंट पडले तर अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या स्मशानभूमीमध्ये एक विद्युतदाहिनी आहे. पर्यावरणपूरक स्मशानभूमी म्हणून या ठिकाणी विद्युतदाहिनी उभारली आहे. मात्र, विद्युतदाहिनीसाठी नवीन जनरेटर लावले आहे. त्यावर शेड न केल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यामध्ये सदर जनरेटर देखील न वापरता गंजून खराब होण्याची दाट शक्यता आहे. आधीचा जनरेटर देखील न वापरल्याने गंजून खराब झाला आहे, असे निवेदनात नमूद करुन, ‘करावे गावातील स्मशानभूमीची तत्काळ दुरुस्ती करावी', अशी मागणी शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. यावेळी शिवसेना नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख सुमित्र कडू, उपशहर प्रमुख समीर बागवान, शाखाप्रमुख संतोष सावंत, युवा सेना शाखाधिकारी अक्षय गमरे, शुभम साळवे आदी उपस्थित होते.