‘पंचायतन मंदिर'चा वर्धापन दिन उत्साहात साजरा
पनवेल : पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या संकल्पनेतून ‘जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था'च्या माध्यमातून पंचायतन मंदिर, नढाळ वाडी, चौक तालुका खालापूर येथे १३ मे २०२२ रोजी या मंदिरांचा भव्यदिव्य असा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याद्वारे स्थापना करण्यात आली. श्री. मयुरेश्वर गणेश, संकटमोचन श्री. हनुमान, श्री. साईबाबा, श्री. भवानी माता आणि नढाळेश्वर महादेव या पाच मंदिरांचे ‘भव्य-दिव्य' असे आध्यात्मिक संकुल उभारण्यात आले आहे. यावर्षी मंदिराचा तिसरा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात हरिपाठ, श्रीं ची पालखी मिरवणूक दिंडी सोहळा, संगीत भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष ना. अण्णासाहेब बनसोडे, लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल पंचायत समिती माजी सभापती काशिनाथ पाटील, कृ.ऊ.बा.समिती सभापती नारायण घरत, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपा ज्येष्ठ नेते नंदकुमार पटवर्धन, खालापूर माजी नगराध्यक्ष सौ. शिवानी जंगम, शेकाप खालापूर तालुका चिटणीस संतोष जंगम तसेच माजी नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘पंचायतन मंदिर'तर्फे पायी दिंडी चालत जाणाऱ्या सर्व भक्तांसाठी सभागृहात राहण्याची मोफत सेवा देण्यात येते. भक्तांसाठी अत्यल्प दरात भक्त निवासाची व्यवस्था या ठिकाणी आहे. दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना मोफत चहा-पाणी अन्न सेवा संस्थेच्या माध्यमातून देण्यात येते. सांप्रदायिक, भजन कीर्तन कार्यक्रमासाठी मोफत सभागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. शैक्षणिक सेवेच्या दृष्टीने परिसरातील हिमांशू दिलीप पाटील इंग्लिश मीडियम स्वुÀल मधून अत्यल्प दरात इंग्रजी माध्यमाची शिक्षण सेवा देण्यात येते. शाळेमध्ये पालक नसणाऱ्या आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम नसणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण सेवा आणि आवश्यक ते सहकार्य अशाप्रकारे विविध सुविधा श्री क्षेत्र पंचायतन मंदिराच्या परिसरातून देण्यात येतात.
-प्रितम जनार्दन म्हात्रे, अध्यक्ष-जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था.