अखेर ९ वर्षांनी मिळाला न्याय    

अन्य २ सहकाऱ्यांना ७ वर्षे सश्रम कारावास

नवी मुंबई : संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा फैसला २१ एप्रिल रोजी झाला. न्यायालयाने या प्रकरणातील दोषी आरोपी अभय कुरुंकर याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर तुकडे केलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणाऱ्या कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या दोघांना ७ वर्षाची शिक्षा ठोठावली. मात्र, या दोन्ही आरोपींनी ७ वर्षाची शिक्षा भोगली असल्याने या दोघांची सुटका झाली.  

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात गोरे आणि बिद्रे कुटुंबियांनी केलेला संघर्ष, सरकारी वकिलांनी योग्यरितीने मांडलेली बाजू आणि महिला पोलीस अधिकाऱ्याने अतिशय उत्तम रितीने केलेला तपास यामुळे या हत्याकांडातील आरोपींना अखेर शिक्षा झाली. ९ वर्षांनंतर अश्विनी बिद्रे यांना न्याय मिळाल्याने गोरे आणि बिद्रे कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.    

अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी बडतर्फ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यानेच अश्विनी यांची निर्घृणपणे हत्या करुन त्यांच्या मृतदेहाचे तुकडे भाईंदरच्या खाडीत टाकून दिल्याचे साक्षी पुराव्यावरुन सिध्द झाले आहे. तसेच कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या दोघांनी अश्विनीच्या मृतदेहाच्या तुकडयांची विल्हेवाट लावण्यासाठी कुरुंदकरला मदत केल्याच्या आरोपावर देखील न्यायालयाने गत सुनावणीवेळी शिक्कामोर्तब केले होते.  

त्यामुळे पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती के. जी. पालदेवार यांनी या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी बडतर्फ पोलीस निरीक्षक अभय कुरुंकर याला हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तर पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या दोघांना ७ वर्षे आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.  

कुरुंदकरला इतर कलमासाठी झालेली शिक्षा...
आरोपी अभय कुरुंदकर याला कलम ३०२ अंतर्गत हत्येच्या गुह्यात तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी देखील दोषी ठरवण्यात आले असून त्यात त्याला ७ वर्षे शिक्षा आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कलम ३६४ नुसार (अपहरण) १० वर्षे शिक्षा आणि १० हजार रुपये दंड, तसेच कलम ३२३ मारहाण करणे या कलमानुसार १ वर्षे शिक्षा आणि १० हजार रुपये दंड, तसेच ५०६(२) धमकी देणे या गुन्ह्यात ७ वर्षे शिक्षा आणि १० हजाराचा दंड तसेच कलम ४१७ फसवणूक प्रकरणात १ वर्षे शिक्षा आणि ३ हजार रुपये दंड, त्याचप्रमाणे कलम ४६५ बनावटगिरी केल्याप्रकरणी २ वर्षे शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड, त्याचप्रमाणे कलम ४६८ साठी ७ वर्षे आणि १० हजार रुपये दंड, कलम ४७१ साठी २ वर्षे शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड, कलम २१८ साठी ३ वर्षे शिक्षा आणि १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. आरोपी अभय कुरुंदकर ७ डिसेंबर २०१७ ते २१ एप्रिल २०२५ या ७ वर्षे ४ महिन्याच्या कालावधीत जेलमध्ये राहिल्याने त्याला ठोठावण्यात आलेल्या शिक्षेतून ४२८ नुसार त्याला सवलत मिळू शकते.  

सदरचा खटला परिस्थीतीजन्य पुराव्यावर उभा होता. त्यामुळे सर्व घटनांची श्रृंखला न्यायालयासमोर सिध्द करावी लागली. अशा काही घटना होत्या, ज्यात आरोपीने अनेक चुका होत्या. या सर्वबाबी सबळ पुराव्यासह न्यायालयासमोर उभे केल्यामुळे अश्विनी बिद्रे-गोरे यांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला अखेर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्यामुळे खऱ्या अर्थाने अश्विनी बिद्रे यांना  न्याय मिळाला आहे.
-ॲड. प्रदीप घरत, सरकारी वकील.

या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आमच्या सर्व टीमने शंभर टक्के प्रयत्न केले. त्यामुळे आरोपींना शिक्षा झाली. २ वर्षानंतर या हत्या प्रकरणाच्या प्रत्यक्ष तपासाला सुरुवात झाल्याने त्याचा तपास करण्यात बऱ्याच अडचणी होत्या. मात्र, आमच्या टीमने तांत्रिक पुरावे आणि परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले. जवळपास ६-७ वर्षे आम्ही या प्रकरणावर काम करत होतो. न्यायालयासमोर आम्ही सादर केलेले तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरण्यात आले.  
-संगिता शिंदे-अल्फान्सो, सहाय्यक पोलीस आयुक्त.

या सर्व प्रकरणात ॲड. प्रदीप घरत यांनी अतिशय परिश्रम घेत भक्कमपणे बाजू मांडली. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो यांनी या प्रकरणात उत्तमरित्या तपास करुन पुरावे सादर केल्यामुळे सदर खटला उभा राहिला. प्रसारमाध्यमांनी सदर प्रकरण लावून धरल्यामुळे अखेर आरोपींना शिक्षा झाली. तसेच निकालाबाबत समाधानी आहे; परंतु त्यात काही त्रुटी आहेत. तपास अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक काही पुरावे जोडले नाही. सुरुवातीपासून तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी. यात तत्कालीन नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी देखील यामध्ये आम्हाला साथ न देता आरोपीला साथ दिली आहे. यामुळे आम्ही प्रत्येकाला शिक्षा व्हावी यासाठी उच्च न्यायालयात जाणार आहोत.
-राजू गोरे, मयत अश्विनी बिद्रे यांचे पती. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

सायबर सुरक्षा-गुन्हे तपासाचे ५०० पोलिसांना प्रशिक्षण