ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे गौतम बुध्द यांचा ध्यानमग्न पुतळा

नवी मुंबई : आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर नवी मुंबई महापालिकेच्या वतीने नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक यांच्या हस्ते, आ. मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत १२ जुलै रोजी संपन्न झाले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, माजी महापौर जयवंत सुतार आणि सुधाकर सोनवणे, माजी उपमहापौर अनिल कौशिक, माजी विरोधी पक्षनेते नामदेव भगत, ‘भाजपा'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, सिद्राम ओव्हाळ, महेश खरे, रविंद्र सावंत, शशिकला जाधव तसेच इतर माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल, पुष्परोपाची कुंडी आणि संविधान उद्देशिकेची फोटोफ्रेम देऊन सन्मान करण्यात आला.

नेरुळ, सेवटर-६ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई स्थळ पर्यटकांचे नवी मुंबईतील आकर्षण केंद्र म्हणून सुपरिचीत असून या ठिकाणी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानुसार २.८० मीटर उंचीचा भगवान गौतम बुध्द यांचा ध्यानमग्न भव्य पुतळा स्थापित करण्यात आलेला आहे. तेथील दर्शनी भागात ध्यानमग्न मुद्रेत असलेल्या पुतळ्यामुळे या परिसराच्या सौंदर्यात आणि लौकिकात लक्षणीय भर पडलेली आहे.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ना. गणेश नाईक यांनी नवी मुंबई भगवान गौतम बुध्दांच्या पंचतत्वांची अंमलबजावणी करणारे शांतताप्रिय शहर असल्याचा विशेष उल्लेख करीत गौतम बुध्दांच्या पुतळ्यामुळे या परिसराला तेजस्विता प्राप्त झाली असल्याचे सांगितले. नवी मुंबई शहरामध्ये सर्व सुविधांच्या गुणवत्तापूर्ण पूर्ततेसोबतच सांस्कृतिक शहर म्हणून विकास व्हावा यादृष्टीने केल्या जात असलेल्या अशा कामांबद्दल त्यांनी प्रशंसा केली.  

आ. मंदाताई म्हात्रे यांनी ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे भगवान गौतम बुध्द यांचा भव्य पुतळा उभारण्याचा संकल्प आज प्रत्यक्षात साकारत असल्याचा आनंद व्यक्त केला. जगातील लोकांना युध्द नको तर शांतीचा संदेश देणारा बुध्द हवा अशा शब्दात बुध्द विचारांचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी पुतळ्याच्या स्थापनेसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा विशेष उल्लेख केला. आगामी काळात नवी मुंबईत संविधान शिल्प आणि भवन तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आयएएस अभ्यासिका सुरु करण्याची मागणी त्यांनी केली.

ज्वेल ऑफ नवी मुंबई या विस्तृत आकाराच्या उपवनामधील मोठ्या पॅसेजमध्ये मध्यभागी डायमंडची प्रतिकृती असून त्याच्या दोन्ही बाजुस जीने बनवून मध्यभागी उंच चबुतऱ्यावर भगवान गौतम बुध्द यांचा २.८० मीटर उंचीचा ध्यानमग्न भव्य पुतळा स्थापित करण्यात आलेला आहे. या पुतळ्यामुळे आधीच आकर्षक असलेल्या या परिसराच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडलेली असून त्यासोबत सामाजिक शांती व मानवतेच्या संदेशाचेही प्रसारण होत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

5 जी बेसबँड युनिट चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश