नवी मुंबईत स्वातंत्र्य दिनानिमित्त खारघर रेल्वे स्थानकावर विशेष तपासणी
नवी मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे काम सर्वत्र सुरु आहे. याच अनुषंगाने खारघर रेल्वे स्थानकावर बी.डी.डी.एस. (मुंबई लोहमार्ग) टीमकडून विशेष तपासणी करण्यात आली.
नवी मुंबईत सर्वत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, संभाव्य सुरक्षेच्या दृष्टीने विशेष तपासणी मोहिमा सुरु आहेत. त्याचबरोबर रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे देखील काम सर्वत्र सुरु आहे. खारघर रेल्वे स्थानकाच्या वर असलेल्या पार्कींगमध्ये व परिसरात दररोज शेकडो दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. त्यामुळे बुधवारी मुंबई लोहमार्गाच्या बीडीडीएस पथकाकडुन खारघर रेल्वे स्थानक व परिसरातील पार्किंग जागेची बारकाईने तपासणी करण्यात आली. मात्र, रेल्वे पोलिसांच्या तपासणीत कोणतीही आक्षेपार्ह बाब किंवा संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. रेल्वे पोलिसांकडुन प्रत्येक वाहनाचे परीक्षण, परिसराची पाहणी आणि सुरक्षेच्या मापदंडांची पूर्तता यावर विशेष भर देण्यात येत आहे.
या मोहिमेत पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तांबोळी, पोलीस उपनिरीक्षक जगताप, पोलीस उपनिरीक्षक भालशंकर यांच्यासह चार पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा वस्तू निदर्शनास आल्यास त्वरित माहिती देण्याचे आवाहन केले आहे.