मीरा भाईंदरच्या शिवसेना शाखेत मराठी भाषेची शिकवणी
भाईंदर : मीरा भाईंदरमध्ये कोणताही भाषावाद निर्माण होऊ नये, अमराठी नागरिकांना सहजतेने मराठी भाषा शिकता यावी यासाठी शिवसेनेच्या प्रत्येक शाखेत बाराखडीची पुस्तके ठेऊन जबरदस्ती न करता प्रेमाने मराठी शिक्षणाची विनामूल्य व्यवस्था परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातर्फे करण्यात येणार आहे.
मीरा भाईंदरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पसरवण्यात येणाऱ्या हिंदी-मराठी भाषा वादावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक महत्त्वपूर्ण उपक्रम जाहीर केला आहे. त्याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, आम्ही विकासासाठी आलो आहोत, फूट पाडण्यासाठी नाही, आम्हाला भाषावाद नको म्हणून अमराठी नागरिकांनी सहजतेने मराठी शिकता यावी यासाठी शिवसेनेच्या प्रत्येक शाखेत बाराखडीची पुस्तके ठेऊन मराठी शिक्षणाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कोणावरही जबरदस्ती न करता प्रेमाने मराठी शिकवण्यात येईल. सर्व भाषांचा सन्मान महत्त्वाचा आहे. पण महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी येणे आवश्यक आहेच. ती जबरदस्तीने नव्हे तर आत्मीयतेने शिकवायची आहे. त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून हा मराठी स्नेह उपक्रम सुरू करत आहोत. अमराठी बांधवांनी शिवसेना शाखेत येऊन प्रेमाने मराठी शिकावी. आपण सर्वांनी भाषेचा सेतू बांधूया, भिंती नाही असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले आहे.