‘एपीएमसी'च्या सचिव पदी शरद जरे

वाशी : वाशी मधील ‘मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती'चे (एपीएमसी) सचिव पी. एल. खंडागळे यांची अपर निबंधक सहकारी संस्था, पुणे या पदावर नियुक्ती झाल्याने रिक्त झालेल्या ‘मंुबई कृषि उत्पन्न बाजार समिती'च्या सचिव पदी शरद जरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शरद जरे यापूर्वी विभागीय सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत होते.

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ अशी वाशी मधील ‘मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती'ची ओळख असून, या ठिकाणी सध्या प्रशासक राजवट आहे. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर एपीएमसी संचालक मंडळ निवडणूक होईल, अशी अपेक्षा असताना पणन संचालकांनी या ठिकाणी थेट स्वतःची प्रशासक म्हणून नेमणूक केली होती. या निर्णयावर देखिल बराच वादंग निर्माण झाला होता. एपीएमसी संचालक मंडळ निवडणूक न घेता प्रशासक नेमला जाणार असल्याची कुणुकण विद्यमान एपीएमसी संचालकांना लागली असल्याने संचालकांनी मुदतवाढीसाठी आधीच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने देखील एपीएमसी संचालक मंडळाला मुदतवाढ देत तात्काळ एपीएमसी संचालक मंडळ निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, या सर्व न्यायालयीन प्रक्रियेत बाजार समिती प्रशासनाची वकिलांमार्फत न्यायालयात बाजू मांडण्यात एपीएमसी सचिव पी. एल. खंडागळे अपयशी ठरले असल्याची चर्चा एपीएमसी बाजार आवारात होती.त्यामुळे न्यायालयाीन निकाल लागताच खंडागळे यांच्या बदलीची वावडी उठली होती. अखेर २९ ऑक्टोबर रोजी राज्याचे उपसचिव नितीन गायकवाड यांच्या आदेशाने पी. एल. खंडागळे यांची अपर निबंधक सहकारी संस्था, पुणे या पदावर  नियुक्ती झाली असून, त्यांच्या जागी शरद जरे यांची एपीएमसी सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली