दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करा -खा. डॉ. श्रीकांत शिंदे

ठाणे : लोकल मधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी ‘कल्याण'चे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात ९ जून रोजी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची खासदार डॉ. शिंदे यांनी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून खासदार डॉ. शिंदे यांनी याप्रसंगी शोक व्यक्त केला. यावेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

मुंब्रा लोकल अपघातातील १० जणांना कळवा मधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच एकाचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या दोघांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले आहे. ७ जखमी रुग्णांवरील धोका टळला असून या अपघातात आतापर्यंत एकूण ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली. मुंब्रा स्टेशनजवळ एक वळण आहे. तिथे अप लोकल आणि डाऊन लोकल जात असताना दोन्ही लोकल मधील काहीजण खाली पडले तर काहीजण ट्रेनच्या आतमध्ये पडले, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. 

खासदार डॉ. शिंदे म्हणाले की,
कल्याण-कर्जत परिसरात मोठ्या संख्येने नागरिक राहतात. त्यामुळे या मार्गावर लोकल फेऱ्या वाढवणे आवश्यक आहे. प्रवासी संघटनांकडून लोकल संख्या वाढवण्याची वारंवार मागणी केली जाते. ठाणे-कल्याण पाचवी आणि सहावी मार्गिका सुरु झाल्यानंतर लोकल फेऱ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली. मात्र, पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विस्तार होणे आवश्यक आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाचे काम सुरु आहे. सदरचे काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा लोकल फेऱ्यांची संख्या आणखी वाढेल, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच कल्याणच्या पुढे तिसरी आणि चौथी मार्गिका तयार करण्याचे काम सुरु असून यासाठी जमीन अधिग्रहण केले जात आहे. लोकल फेऱ्या जेव्हा वाढतील तेव्हा गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपे जाईल. नवीन मार्गिका वाढवण्याबरोबरच १२ डब्ब्यांच्या लोकल १५ डब्ब्यांमध्ये परावर्तीत करणे तितकेच गरजेचे आहे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. 

दरम्यान, रेल्वे प्रवाशांची दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी आहे, या मागणीचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु, असे आश्वासन खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी दिले. पूर्वी दिवा येथे जलद लोकलला थांबा नव्हता; मात्र आता दिवा येथे जलद लोकल थांबतात, असे डॉ. शिंदे म्हणाले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पावसाळ्यातील दक्षतेसह स्वच्छता, आरोग्य, शाळाप्रारंभ, ऑनलाईन सेवांचा आढावा