समृध्दी महामार्ग, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, अटल सेतू मार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी

उरण : महाराष्ट्र सरकार तर्फे इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी नवीन ‘इलेक्ट्रिक वाहन निती २०२५' घोषित करण्यात आली आहे. त्याअंतर्गत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, समृध्दी महामार्ग आणि शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू मार्गावर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना पूर्ण टोलमाफी देणारा अद्यादेश राज्य सरकार तर्फे काढण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचा योग्य समतोल साधण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सदर निर्णय निसर्ग प्रेमी,पर्यावरण प्रेमी सामाजिक संस्था-संघटना आणि प्रवाशी वर्गांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देणारे धोरण राज्य सरकारने आणले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणाला २९ एप्रिल २०२५ रोजी मंजुरी देण्यात आली होती. मात्र, या धोरणासंबंधीचा शासननिर्णय जारी न झाल्याने टोलमाफी लागू झाली नव्हती. २४ दिवसांनी टोलमाफी आदेश काढण्यात आला.

इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर राज्य सरकार प्रोत्साहन रक्कम देणार आहे. प्रोत्साहन रक्कम राज्य सरकारकडून वाहन उत्पादक कंपन्यांना दिली जाणार आहे. वाहन खरेदीवर तेवढी रक्कम कंपनी ग्राहकांकडून कमी घेणार आहे. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या राज्य मार्गावर ५० टक्के टोलमाफी दिली जाईल, असे यापूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, २३ मे रोजी काढलेल्या आदेशात या मागविर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीकडून घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर दर २५ किमी अंतरावर ईव्ही चार्जिंग स्टेशन बांधणे बंधनकारक करण्याची सरकारची योजना आहे. सर्व विद्यमान आणि नवीन पेट्रोल पंपांवर किमान एक ईव्ही चार्जिंग सुविधा असण्यासाठी तेल विपणन कंपन्या आणि वाहतूक विभाग यांच्यात एक सामंजस्य करार केला जाणार आहे. प्रत्येक एसटी बस डेपो आणि स्थानकावर जलद चार्जिंग सुविधा देखील अनिवार्य केली जाणार आहे. या धोरणामुळे मुंबई-पुणे आणि मुंबई-नागपूर मार्गादरम्यान शाश्वत वाहतूक मॉडेल्सनाही प्रोत्साहन मिळणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांना १०० टक्के टोल माफी देण्यात आल्याने या निर्णयाचे विविध निसर्ग प्रेमी, पर्यावरण प्रेमी संस्था, विविध सामाजिक संस्था, विविध प्रवाशी संघटनेकडून स्वागत करण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रवाशी वर्गांची वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. याशिवाय पर्यावरण संतुलन देखील व्यवस्थित राहणार आहे.

इलेक्ट्रिक वाहनांवर प्रति वाहन कमाल प्रोत्साहन रक्कम
दुचाकी वाहन  - १० हजार रुपये
तीन चाकी वाहन - ३० हजार रुपये
तीन चाकी मालवाहू वाहन - ३० हजार रुपये
चारचाकी वाहन (परिवहनेतर) - १.५० लाख रुपये
चारचाकी वाहन (परिवहन) - २ लाख रुपये
चारचाकी हलके मालवाहू वाहन - १ लाख रुपये
बस (एम ३, एम ४) (राज्य परिवहन उपक्रम एसटीयू) - २० लाख रुपये
बस (एम ३, एम ४) खासगी राज्य /शहरी परिवहन उपक्रम - २० लाख रुपये 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भिवंडी महापालिका आर्थिक संकटात