सिडकोचे जाचक हस्तांतरण शुल्क रद्द करून घरे फ्री होल्ड करावीत
नवी मुंबई : सिडको महामंडळाने अलीकडेच लागू केलेले जाचक हस्तांतरण शुल्क रद्द करून घरे फ्री होल्ड करावीत, अशी मागणी माजी आमदार संदीप नाईक यांनी केली आहे.
संदीप नाईक यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, नगरविकास विभाग आणि सिडको महामंडळाला याबाबत दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी पत्र पाठवून ही मागणी केलेली आहे. सिडकोने नव्याने बदल केलेल्या नियमानुसार मालमत्ता हस्तांतरणासाठीच्या रक्कमेत मोठी वाढ केली असून निवासी मालमत्तेच्या हस्तांतर शुल्कात ५ ते १० टक्के व व्यावसायिक गाळयांच्या हस्तांतर शुल्कात तब्बल ५० टक्क्यांनी शुल्क वाढ केली आहे. मंगळवार, १ एप्रिल २०२५ पासून हे नवे बदल लागू करण्यात आले असून दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, सानपाडा, जुुईनगर, नेरुळ, सीबीडी-बेलापूर येथील मालमत्ता विषयक व्यवहारांमध्ये हे वाढीव दर लागू होणार आहेत. यामुळे मालमत्ता खरेदी आणि विक्री करण्यावरही याचा थेट परिणाम होताना दिसेल ही बाब नाकारता येत नाही. सदर बदलानंतर निवासी मालमत्ता व व्यावसायिक मालमत्ता हस्तांतरणासाठीची जाचक रक्कम सामान्य नागरिकांना परवडणारी नाही. याचा थेट परिणाम मालमत्ता खरेदी विक्री व्यवहारांवर दिसेल. या जाचक शुल्क वाढी विरोधात सामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
सिडकोच्या घरांंवरील लिज फ्री होल्ड करण्याचा निर्णय ऑक्टोंबर २०२४ च्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता. सदर ठरावाच्या अनुषंगाने शासनाने सिडकोच्या मालमत्ता हस्तांतर शुल्कात केलेली दरवाढ त्वरित रद्द करुन घरे फ्री होल्ड करण्यात यावीत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत असून त्या अनुषंगाने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यात यावा, अशी विनंती संदीप नाईक यांनी पत्रात केली आहे.