मालमत्ता कर वसुलीसाठी सर्वप्रथम जनजागृती करा
भिवंडी : मालमत्ता कर वसुलीसंदर्भात भिवंडी महापालिका आयुक्त अनमोल सागर यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपायुक्त (कर), सहाय्यक आयुक्त, कर निरीक्षक, सर्व वसुली लिपीक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये मालमत्ता कर वसुलीच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. मालमत्ता कर वसुली कार्यात मागे असलेल्या, ज्या लिपीकांची मालमत्ता कर वसुलीची कामगिरी अत्यंत असमाधानकारक आहे, अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्त अनमोल सागर यांनी दिले आहेत. तसेच चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या व्याजात सूट देण्याबाबत कुठल्याही प्रकारची अभय योजना अंमलात आणू नये, असेही सूचित करण्यात आले. तर कर वसुलीमध्ये गती आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.
विशेष म्हणजे मालमत्ताधारकांना वेळेवर कर भरण्यास प्रोत्साहन मिळावे याकरिता आयुक्त सागर यांनी जनजागृती मोहीम राबवण्यास सांगून मोठ्या थकबाकीधारकांची यादी वर्तमानपत्रात तसेच चौकाचौकात बॅनरवर प्रसिध्द करण्याचेही सुचवले आहे. तसेच वसुलीची कारवाई अधिक तीव्र करण्याबरोबरच कर न भरणाऱ्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाईची मोहीम सुरु करण्याचे आदेश आयुक्त अनमोल सागर यांनी सर्व वसुली कर्मचाऱ्यांना दिल्या. यासह कर वसुली संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी कर्तव्यनिष्ठ कामे करुन महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याचे आयुवत सागर यांनी सक्त आदेश वजा आवाहन केल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त (कर) बाळकृष्ण क्षीरसागर यांनी दिली.