वाढीव कचरा संकलन करावर शिवसेना आक्रमक
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने केलेल्या कचरा संकलन करवाढी विरोधात ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष'तर्फे मोर्चा काढत निषेध व्यक्त करण्यात आला. महापालिका हाय हाय, केडीएमसी हाय हाय अशा जोरदार घोषणाबाजी करत मोर्चकरी महापालिका मुख्यालयाचे बंद दार ढकलून थेट आतमध्ये सुरक्षारक्षक आणि पोलिसांची एकच धावपळ उडाली. यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी, संपर्कप्रमुख साईनाथ तारे, जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
‘केडीएमसी'ने गेल्याच महिन्यात महापालिका क्षेत्रातील ७ प्रभागांच्या स्वच्छतेसाठी खासगी संस्थेला कंत्राट दिले आहे. या कंत्राटाच्या रवकमेवरुन जोरदार खडाजंगी पहायला मिळत आहे. तसेच केडीएमसी प्रशासनाने घरगुती तसेच व्यावसायिक वापरकर्त्यांच्या कचरा संकलन शुल्कामध्ये ३०० रुपयांनी वाढ केली आहे. त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत असून काही दिवसांपूर्वीच ‘मनसे'ने याच मुद्द्यावर ‘केडीएमसी'वर मोर्चा काढला होता.
त्यापाठोपाठ ९ जून रोजी ‘शिवसेना'नेही मोर्चा काढून केडीएमसी प्रशासनाचा निषेध केला. तसेच नागरिकांवर लादलेली करवाढ तातडीने रद्द करण्याची मागणी केली. यावेळी ‘शिवसेना'च्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेत आपल्या मागणीचे निवेदनही त्यांना सादर केले.
दरम्यान, केडीएमसी प्रशासनाने केलेली करवाढ लवकरात लवकर रद्द करावी, अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन ‘शिवसेना' पक्षाकडून केले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष दिपेश म्हात्रे यांनी यावेळी दिला. तर केडीएमसी प्रशासनाने करवाढ रद्द करण्यासाठी आयुक्त अभिनव गोयल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे म्हात्रे म्हणाले.