अवकाळी पावसाने झोडपले

नवी मुंबई : मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ६ मे रोजी अवकाळी पावसाने हजेरी लावली. महाराष्ट्रात वादळी-वाऱ्यासह पाऊस कोसळला. काही भागात मुसळधार पावसाचा फटका बसून अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. तर ७ मे रोजी सकाळी १०च्या सुमारास पुन्हा मुंबई, उपनगरसह नवी मुंबई, ठाणे मध्ये अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह कोसळला. अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने एन्ट्री मारल्यामुळे सर्वसामान्यांची धावपळ झाली. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या सरी कोसळल्या. मे महिना सुरु असून अंगाची उन्हामुळे लाही लाही होत असताना अचानक पाऊस आल्यामुळे वातावरण थोडा गारवा निर्माण झाला आहे.

दुसरीकडे ७ आणि ८ मे या दिवशी मोठ्या प्रमाणात लग्नसराई असल्यामुळे या लग्नासाठी उभारलेले मांडव वादळी वाऱ्याने उडवले आहेत.

हवामान विभागाकडून कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नंदूरबार, येथे वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने ७ मे रोजी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार बरसलेल्या अवकाळी पावसामुळे सकाळी कामधंद्यानिमित्त सकाळी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची पुरती तारांबळ उडाली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस आला. तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडाली.

दक्षिण तेलंगण आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून त्यापासून रायलसीमा, तामिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. त्यामुळे राज्यात ढगाळ आकाश होत असून मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस, गारपिटीने हजेरी लावली होती. ढगाळ आकाश आणि पावसाळी हवामनामुळे तापमानात सातत्याने घट होताना दिसत आहे. ठाणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस झाला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला, तर काही भागात रिपरिप पाऊस कोसळला.

६ मे रोजी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर ७ मे रोजी सकाळी पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे. ६ मे रोजी अचानक आलेल्या पावसामुळे कल्याण पूर्वे मध्ये झाड पडून ३ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक भागांतील वीज पुरवठा खंडीत झाला होता. सायंकाळी वसई-विरार परिसरात अचानक आलेल्या जोरदार वादळ आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तासाभराच्या मुसळधार पावसात अनेक झाडे रस्त्यावर कोसळली, वीजेचे खांब पडले आणि वाहतूकही ठप्प झाली. या वादळाचा फटका विविध सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांनाही बसला. अनेक ठिकाणी लग्नसोहळ्याचे मंडप वाऱ्यामुळे उध्वस्त झाले. पावसामुळे कल्याणमध्ये अनेक ठिकाणी बत्ती गुल झाली होती. शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे अनेक भागांत झाडांची पडझड झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे घरांचे पत्रेही उडाले आहेत. वीजपुरवठा खंडीत झाल्याने अनेक गावे अंधारात होती.

वादळी वाऱ्याचा स्मशानभूमीला तडाखा; झाडांची पडझड

मिरा-भाईंदरमध्ये ६ मे रोजी रात्री ९ च्या सुमारास सोसाट्याचा वादळी वारा आल्याने मोठ्या प्रमाणात हवेत उडालेल्या धुळीमुळे लोकांची दाणादाण उडाली. त्यातच भाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीत सीएनजी दाहिनीची चिमनी आणि रेल्वे स्थानकाजवळ मोठे झाड कोसळून खाली पडल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

मिरा-भाईंदरमध्ये ६ मे रोजी रात्री ९च्या सुमारास सोसाट्याचा वादळी वारा आणि त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाल्याने नागरिकांचे जनजीवन अस्ताव्यस्त झाले. महापालिकेच्या भाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीतील सीएनजी दाहिनीची चिमनी वादळी वाऱ्यामुळे कोसळून खाली पडली. अन्य चिमन्या देखील वादळी वाऱ्याने डुलत असल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने आजुबाजुच्या घरांवर किंवा रस्त्यावर चिमनी पडली नाही, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानकावरील स्कायवॉक जवळ मोठे झाड रस्त्यावर पडले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी झाड रस्त्यावर मधोमध आडवे पडल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रात्री कामावरुन घरी जाणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले. रिक्षा आणि खाजगी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नागरिकांचे जनजीवन अस्ताव्यस्त झाले होते. परिसरातील नागरिकांनी आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटना स्थळी येऊन झाड बाजुला करत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मान्सूनपूर्व तयारीला वेग!