जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा उत्साहात सुरु
नवी मुंबई : क्रीडा-युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत होणाऱ्या ‘सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा'चे आयोजन नवी मुंबई महापालिका क्रीडा-सांस्कृतिक विभागच्या वतीने नेरुळ, सेवटर-१९ मधील कै.यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल मैदानावर करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ‘क्रीडा-युवक सेवा संचालनालय'च्या उपसंचालकांकडून ऑनलाईन प्रणालीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील महापालिका आणि खाजगी शाळा-कनिष्ठ महाविद्यालये या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. सन २०२५-२६ मधील ‘सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा'मध्ये १५ वर्षाआतील मुले, १७ वर्षाआतील मुले आणि मुलींच्या संघांना प्रवेश घेता येतो. या अनुषंगाने १५ वर्षाआतील मुलांमध्ये ३६ संघ, १७ वर्षाआतील मुलांमध्ये ३८ संघ आणि १७ वर्षाआतील मुलींमध्ये २३ संघ अशा एकूण ९७ संघांनी सहभाग नोंदविलेले आहेत.
या स्पर्धेतून विजयी होणारा संघ पुढील मुंबई विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरतो. तो संघ यापुढच्या स्तरावरील स्पर्धेत नवी मुंबई महापालिका जिल्ह्याचा संघ म्हणून मुंबई विभागीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. ‘सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा'चे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेमधील विजेता संघ विभागात आणि राज्य स्तरावर विजयी झाला तर पुढील राष्ट्रीय स्पर्धेत त्या संपूर्ण संघास खेळण्याची संधी मिळते. अशा प्रकारे संपूर्ण संघास राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणारी ‘सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा' एकमेव स्पर्धा आहे.
स्कुल गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित होणाऱ्या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरिता राज्यस्तरीय स्पर्धेतून राज्याचा संघ निवडण्यासाठी स्वतंत्र निवड चाचणी आयोजित केली जाते. ज्यामधून महाराष्ट्र राज्याचा संघ पुढील राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवडला जातो. मात्र, ‘सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा' स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येत असते. ज्यामुळे एकाच संघाला जिल्हा पातळी पासून थेट राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळण्याची संधी मिळते. या संधीचा लाभ यापूर्वी सन २०१५-१६ मध्ये नवी मुंबई महापालिका जिल्हा संघास, फादर ॲग्नल स्कुल, वाशी यांच्या फुटबॉल संघाच्या माध्यमातून मिळाला असून या संपूर्ण संघाला राष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा बहुमान मिळालेला आहे. त्यांनी पुन्हा एकदा गतवर्षी राज्यस्तरावर उपविजेते पद मिळविलेले आहे.