चला जाणूया नदीला... प्रकल्प केवळ दिखाव्यापुरता
भिवंडी : भिवंडी शहरातील कामवारी नदीची सध्या वाढत्या प्रदुषणामुळे नदीची गटार गंगा झाली आहे. नदीवर हिरवी जलपर्णी पसरल्याने नदी संपूर्ण हिरवीगार झाली आहे. एकीकडे शासन चला जाणूया नदीला... या प्रकल्पच्या माध्यमातून नद्यांचे पुनर्जीवन करीत आहे; मात्र दुसरीकडे कामवारी नदीच्या प्रदुषणाकडे शासकीय यंत्रणा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे भिवंडीत चला जाणूया नदीला... प्रकल्प केवळ दिखाव्यापुरता राबवला जात असल्याची चर्चा सध्या शहरात सुरु आहेत.
दरम्यान, कामवारी नदी तालुक्यातील कवाड नजिकच्या देपिवली गावाच्या कुशीत उगम पावून ग्रामीण भागातून ३२ किलोमीटरचा प्रवास करीत महापालिकेच्या सीमेवरुन वाहत येताना पुढे वसई खाडीत विसावते. पूर्वी या नदीच्या पाण्यावर ग्रामीण भागात शेतकरी भातशेती नंतर उन्हाळी भाजीपाला पिकवत असे. परंतु, नदी जसजशी शहराच्या टप्प्यात येते, तसे या पाण्यात प्रदुषण होण्यात वाढ होत असतानाच नदीपात्रातील अतिक्रमणांमुळे या नदीचा भिवंडी आणि शेलार गावाच्या सीमेलगतचा प्रवास अक्षरशः गटारगंगा म्हणूनच होत आहे. सदर विदारक सत्य डोळ्या समोर दिसत असतानाही याकडे प्रदुषण नियंत्रण मंडळ, स्थानिक महापालिका, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत, तेे त्याहून भयाण आहे.
भिवंडी महापालिका क्षेत्रातील मलनिःस्सारण प्रकल्प अजून अपूर्ण असल्याने शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट खाडीपात्रता सोडले जाते. तर नदी पलिकडील खोणी आणि शेलार ग्रामपंचायत हद्दीतील कपड्यावर आणि धाग्यावर रंग प्रक्रिया करणाऱ्या डाईंग, सायझींग याशिवाय केमिकल कंपन्या त्यांच्या आवारामधील केमिकलयुक्त दुषित पाणी थेट नदीपात्रात सोडतात. यामुळे कामवारी नदी प्रदुषित झाली आहे. विशेष म्हणजे या नदीच्या दुरावस्थेकडे शासकीय यंत्रणा, स्थानिक प्रशासन, महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असताना लोकप्रतिनिधीही नदीच्या पुनर्जीवनासाठी विशेष प्रयत्न करताना दिसत नसल्याने कामवारी नदी सध्या मरणासन्न अवस्थेत आली आहे.
या नदी पात्रातील गाळ काढावा, तिची खोली वाढवून शहरातील पूरपरिस्थिती टाळण्यासाठी संरक्षक भिंत उभारावी असा महत्त्वकांक्षी प्रकल्प २००३ साली राबविण्यात आला. त्यासाठी केंद्र सरकारकडून तब्बल ५ कोटी रुपयांचे अनुदान महापालिकेला मिळाले होते. महापालिकेने सदर पैशातून १ पोकलेन, २ जेसीबी, १५ डंपर खरेदी करुन कामवारी नदी स्वच्छता करण्याचे काम केले. त्यानंतर सदर सर्व यंत्रणा धुळखात पडून राहिल्याने कवडीमोल किंमतीत वाहने भंगाराच्या भावात विकून टाकण्यात आली होती. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाच्या चला जाणूया नदीला... असा विशेष उपक्रम राबवला, ज्यामध्ये फक्त कागदावर कामवारी नदी प्रदुषणमुक्त करुन ती पुन्हा प्रवाहित करण्याच्या वल्गना शासनाच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत करण्यात आल्या आहेत.