सिडकोच्या मेट्रो सेवेवर प्रवाशांच्या पसंतीची मोहर
नवी मुंबई : सिडको महामंडळाच्या मेट्रो मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर मार्गावरील प्रवासी संख्येने, मेट्रो मार्गाचे परिचालन सुरू झाल्यापासून ६ सप्टेंबर २०२५ रोजी विक्रमी एक कोटी प्रवासी संख्येचा टप्पा गाठला आहे. मेट्रो सेवा सुरू झाल्यापासून प्रवाशांचा उदंड प्रतिसाद या सेवेला मिळत असल्याने अवघ्या २ वर्षांत या मार्गावरील प्रवासी संख्येने एक कोटीचा विक्रमी टप्पा गाठला आहे.
नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर मार्गाची अंमलबजाणी सर्वप्रथम करण्यात येऊन या मार्गावर १७ नोव्हेंबर २०२३ रोजी मेट्रोचे परिचालन सुरू झाले. सीबीडी बेलापूर परिसरातील शासकीय कार्यालये, तळोजा एमआयडीसी, खारघर व तळोजा परिसरातील सिडकोची गृहसंकुले यांना कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याकरिता हा मार्ग महत्त्वपूर्ण ठरला आहे. मेट्रो सेवेद्वारे नवी मुंबईतील रहिवाशांना जलद व आरामदायी प्रवासाचा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे.
मेट्रो सेवा अधिक कार्यक्षम करण्याकरिता सिडकोतर्फे वेळापत्रकाचे काटेकोर नियोजन करण्यात येऊन सध्या गर्दीच्या वेळी दर १० मिनिटांनी बेलापूर व तळोजा स्थानकांदरम्यान दोन्ही दिशांना मेट्रोच्या फेऱ्या उपलब्ध आहेत. तर उर्वरित वेळांमध्ये दर पंधरा मिनिटांनी मेट्रोची फेरी उपलब्ध आहे. मेट्रोच्या तिकीट दरात तब्बल ३३ टक्के कपात करण्यात येऊन सध्या तिकीटाचा किमान दर रु. १० कमाल रु. ३० इतका आहे. या प्रवासीस्नेही सुधारणांमुळे सदर मार्गावरील मेट्रो सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. यामुळे अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये मेट्रोच्या प्रवासी संख्येने एक कोटीचा टप्पा गाठणे शक्य झाले आहे.