मंगळागौरीच्या खेळांनी बहरले विष्णुदास भावे नाट्यगृह

नवी मुंबई : २७ जुलै रोजी वाशी मधील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे नवी मुंबईतील महिलांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेले होते. निमित्त होते...‘बेलापूर'च्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या ‘श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था'च्या वतीने दरवर्षी प्रमाणे आयोजिलेल्या मंगळागौरीचा कार्यक्रमाचे. यावेळी तरुणींपासून वयोवृध्द महिलापर्यंत साऱ्यांनीच देहभान विसरुन कार्यक्रमात आपले पारंपरिक मंगळागौरीचे खेळ सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यात कुणी साध्या गृहिणी होत्या, कुणी अभियंता, कुणी शिक्षक, कुणी प्राचार्या, कुणी बचतगट संचालिका, तर कुणी वेलनेस गुरु. यामुळे कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या महिलांसह उपस्थित महिला, प्रमुख पाहुण्यांनी आयोजक आ. मंदाताई म्हात्रे यांचे कौतुक करुन मंगळागौरीच्या खेळांचा आनंद लुटला.

कार्यक्रमाची सुरुवातच महिलांच्या मोठ्या समुहाने सामूहिकपणे केलेल्या दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर महिलांच्या एकेक गटाने आपले खेळ सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळवली. त्याच बरोबर बालगंधर्व पुरस्कार-२०२३ सन्मानित महाराष्ट्र लावणी सम्राट आशीमिक कामठे यांच्या लावणीने अक्षरशः सभागृह टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमला. मंगळागौरी कार्यक्रमामध्ये पारंपरिक वेशातील महिलांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. व्यासपीठावर मंगळागौरीचे खेळ, गाणी सादर करीत असताना सभागृहात उपस्थित महिलांनी नाचगाण्याचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी त्यांच्या आग्रहास्तव आ. मंदाताई म्हात्रे यांनाही नाचण्याचा मोह आवरता आला नाही.

महिला मंगळागौरीची पारंपरिक नृत्ये, गाणी म्हणत खेळ खेळून मनमुराद आनंद लुटताना दिसल्या. यामध्ये लाट्या बाई लाट्या, सारंगी लाट्या, फू बाई फू, अठुडं केलं गठुडं केलं अशी पारंपरिक गाणी आणि खेळ महिला खेळल्या. मंगळागौरीच्या या कार्यक्रमात उत्कृष्ट नृत्य, पारंपरिक गायन आणि विविध प्रकारच्या कला दाखविणाऱ्या महिलांना विविध प्रकारची बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रथम परितोषिक सीवुडस्‌ येथील राजमाता जिजाऊ महिला मंडळ आणि नेरुळ (पश्चिम) मधील हाऊस क्वीन मंगला गौर ग्रुप यांना प्रत्येकी ५००१ रुपये आणि २ पैठणी सहित एक नथ, तर द्वितीय पारितोषिक सीबीडी येथील सह्यद्री मंगळागौर ग्रुप यांना ३००१ रुपये आणि पैठणी सा़ीसहित १ नथ, तर तृतीय पाारितोषिक साई भक्त महिला फाऊंंडेशन यांना २००१ रुपये, पैठणी सहित १ नथ आणि सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, माजी नगरसेवक काशिनाथ पाटील, राजू शिंदे, दीपक पवार,  निलेश म्हात्रे, माजी नगरसेविका अनिता शेट्टी, सुचित्रा पवार, ज्योती पाटील, जयश्री चित्रे, समाजसेवक पांडुरंग आमले, विकास सोरटे, दत्ता घंगाळे, महेंद्र नाईक, प्रमोद जोशी तसेच महिला वर्ग आणि पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मैथिली पाटील हिच्या कुटुंबियांना प्रितम म्हात्रे यांचा आधार