अखेर अपघातग्रस्त विद्यार्थ्याचा मृत्यू

भाईंदर : मिरा-रोडच्या काशीगांव भागातील १२ वर्षीय विद्यार्थी शाळेतून घरी जात असताना नीलकमल नाका येथे सिमेंट तयार करणाऱ्या रेडी मिक्सर गाडीने त्याला धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झाला होता. दुर्दैवाने उपचार सुरु असताना ११ सप्टेंबर रोजी रात्री त्याचा मृत्यू झाला.      

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळील काशीगांव येथील नीलकमल नाका येथून दुपारी शाळेतून घरी जात असलेला सनी रमेश राठोड या १२ वर्षीय मुलाला सिमेंट तयार करणाऱ्या रेडी मिक्सर गाडीने धडक दिली, त्यात तो गंभीर जखमी झाला होता. जवळील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना ११ सप्टेंबर रोजी रात्री सनी याचा मृत्यू झाला. शवाविच्छेदनानंतर नातेवाईकांना त्याचा मृतदेह ताब्यात देण्यात आला. अपघाताच्या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी उस्फुर्त रास्ता रोको आंदोलन केले होते. तसेच मिरा-भाईंदर मधील आरएमसी प्लांट बंद करण्याची मागणी केली होती.

शहरात ५ आरएमसी प्लांट असून त्यातील ३ प्लांट महापालिकेने बंद करण्याची नोटीस पाठवली आहे. परंतु, मुळातच शाळेपासून २०० मीटर अंतराच्या आत असलेल्या या प्लांटला महापालिकेने परवानगी दिलीच कशी? असा प्रश्न उपस्थित करुन आंदोलनकर्त्यानी आता संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली आहे. शिवाय आंदोलन सुरूच ठेवले आहे. दरम्यान, प्रचंड पोलीस बंदोबस्तात सनी यांच्या पार्थिवावर काशिमीरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नगरपालिकेच्या आरोग्य केंद्राची दुरवस्था