महसूल विभाग शासनाचा कणा -ना. आदिती तटकरे

अलिबाग : महसूल विभाग शासनाचा कणा असून महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महिला-बालविकास मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी अलिबाग येथे केले.

१ ऑगस्ट रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयमधील नियोजन भवन हॉल येथे आयोजित महसूल दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर रोजगार हमी योजना, फलोत्पादन-खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उप वनसंरक्षक अलिबाग राहुल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, आदि उपस्थित होते.

शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका कणखरपणे मांडून लोकाभिमुख काम करुन लोकांच्या जवळ जाणे अत्यंत महत्वाचे आहे. शासनाचे नवनवीन उपक्रम येत असून सदर उपक्रम योग्यरितीने राबविण्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून काम केले पाहिजे. महसूल विभाग जनसामान्यांशी संबंधित विभाग आहे. महसूल विभागातील अधिकारी -कर्मचारी यांनी केलेल्या कामाचा गौरव करणे यासाठी महसूल दिन साजरा केला जातो. कर्मचाऱ्यांच्या ज्या हक्काच्या गोष्टी आहेत ते त्यांना देणे आणि काही अडी-अडचणी सोडविल्या जातील, असे ना. आदिती तटकरे म्हणाल्या.  

शासनाने लोकांपर्यंत पोहचण्यासाठी शासन आपल्या दारी, महाराजस्व अभियान असे अनेक उपक्रम राबविले आहेत. आता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे अभियान राबविले जाणार आहे. प्रशासकीय यंत्रणा जिल्ह्यात सक्षम झाली पाहिजे याकरिता प्रत्येक कार्यालयात आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध करुन दिली पाहिले असेही त्या यावेळी म्हणाल्या.

शासन गोरगरीब जनतेचे आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेला ज्या बाबी आवश्यक आहे ते देणे आपले कर्तव्य आहे, अशी भावना प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मनाशी ठेवून काम केले पाहिजे. याकरिता सर्वांनी लोकांच्या हितासाठी काम करावे, अशा सूचना ना. भरत गोगावले यांनी यावेळी अधिकारी-कर्मचारी यांना दिल्या.

प्रारंभी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्रास्ताविक केले. ‘महसूल विभाग'मार्फत १ ऑगस्ट पासून ते ७ ऑगस्ट पर्यंत ‘महसूल सप्ताह' साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याबरोबरच विविध योजनांचे लाभ देण्यात येणार आहेत. महसूल विभागाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती व्हावी आणि त्यांना योजनांचा योग्य लाभ घेता यावा. तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी आणि शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा, यासाठी विशेष मोहिम आणि लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने यावर्षी ‘महसूल दिन' सोबत १ ऑगस्ट पासून ‘महसूल सप्ताह' साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, असे जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले.

यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते स्वामित्व योजना अंतर्गत लाभार्थ्यांची सनद वाटप, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रायगड, उत्कृष्ट कर्मचारी, महसूल विभागातील उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील महसूल विभागातील सर्व तहसिलदार, नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईत ४ नवीन सहाय्यक पोलीस आयुक्तांची नियुक्ती; २ अधिकाऱ्यांची बदली