कळंबोली मॅकडोनाल्डस् समोर वाहतूक काेंडीने नागरिक त्रस्त
नवीन पनवेल : कळंबोली मॅकडोनाल्डस् येथे कोणताही अधिकृत थांबा नसतानाही एवस्प्रेस महामार्गावर ५ पैकी ४ लेन अडवून उभ्या असणाऱ्या खाजगी बसेसमुळे संध्याकाळनंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. मात्र, वाहतूक पोलीस यावर कारवाई करताना दिसून येत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे हाकेच्या अंतरावर वाहतूक विभागाची पोलीस चौकी सुध्दा आहे. तरीही या ठिकाणी नियमित कारवाई होत नाही.
कळंबोली येथील यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग जवळ मॅकडोनाल्डस् हॉटेलसमोर अनेक बसेस रस्त्यावर उभ्या असतात. मुंबई-पुणे महामार्ग कळंबोली येथून सुरू होत असल्यामुळे खारघर, कळंबोली येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक केली जाते.
कळंबोली मॅकडोनाल्डस् येथून सर्रास बेकायदा वाहतूक होते. अनधिकृतपणे उभ्या असलेल्या बसेस रात्रीच्या वेळी ५ पैकी ४ लेन अडवून ठेवतात. त्यामुळे या ठिकाणी अपघात देखील होत असतात. तसेच इतर वाहनांना पुढे जाण्यासाठी जागा देखील नसते. रुग्णवाहिका जाण्यासाठी देखील उशीर होतो. तरीही याठिकाणी बेशिस्त वाहनांवर वाहतूक पोलीस कारवाई करताना दिसून येत नाहीत.
संपूर्ण रस्ता बेशिस्तपणे व्यापणाऱ्या या बसेसमुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. रस्ताही विनाकारण यांच्या बेशिस्तीमुळे सतत जाम होत आहे. त्यामुळे येथील रस्ता मोकळा श्वास कधी घेईल, असा सवाल उपस्थित झाला आहे. बेशिस्त वाहनांवर कळंबोली वाहतूक पोलीस कारवाई करताना कुचकामी ठरत आहेत. पोलीस केवळ २ दिवस कारवाई करतात, त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कारवाईककडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे.