आयुष सिंग या विद्यार्थ्याचा मृत्यू टक्केवारी साठी; ‘मनसे'चा आरोप
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने २५ फेब्रुवारी रोजी महापालिका शाळेतील जवळपास २२०० विद्यार्थ्यांना नेलेल्या खालापूर येथील इमॅजिका पार्क या ॲडव्हेंचर पार्क येथील सहलीत आयुष सिंग या १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. २०१६ शासन निर्णयानुसार शैक्षणिक सहल ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक माहिती देणाऱ्या ठिकाणी नेण्यात यावी. या शासन निर्णयाला केराची टोपली दाखवून हजारो मुलांना कडक उन्हात ॲडव्हेंचर पार्क मध्ये नेण्याचा अट्टाहास मापालिका आयुक्त, शिक्षण विभाग उपायुक्त, शिक्षणाधिकारी यांनी केला. शिवाय बऱ्याच मुलांना जेवण, पाणी देखील देण्यात आले नाही, असे बऱ्याच पालकांचे म्हणणे आहे. शवविच्छेदन अहवालात जरी हृदयविकाराचा झटका असे नमूद असले तरी १४ वर्षीय आयुष सिंग याला मृत्यू होण्याची परिस्थिती निर्माण महापालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजपणामुळे झाली, असा आरोप ‘मनसेे'चे प्रवक्ते तथा शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पत्रकार परिषद मध्ये केला.
‘नमुंमपा'ने इयत्ता पहिली ते चौथी मधील २२,९८५ विद्यार्थ्यांसाठी जवळपास १.४५ कोटी रुपयांचे कंत्राट किडझेनिया यांच्याबरोबर केले. तर इयत्ता पाचवी ते दहावी मधील १८,८६७ विद्यार्थ्यांसाठी इमॅजिका पार्क या ॲडव्हेंचर पार्क यांच्या सोबत २.२३ कोटींचे कंत्राट कोणतीही निविदा न काढता केले. सदर दोन्ही कंत्राट एकल स्त्रोत पध्दतीने काढताना महापालिका शिक्षण विभागाने १ डिसेंबर २०१६ रोजी रोजीच्या उद्योग विभागाच्या शासन निर्णयाचा आधार घेतला आहे. मुळात याच शासन निर्णयात नमूद केले आहे की एकल स्त्रोत पध्दतीने पारदर्शकता राहत नाही. तसेच इमॅजिका सारखे थीम पार्क महाराष्ट्रात अनेक आहेत. किडझेनिया सारखे चिल्ड्रन्स पार्क देखील अनेक आहेत. वेट एन जॉय, एस्सेल वर्ल्ड, टिकुजिनी वाडी, गोरेगाव चित्रपट सृष्टी थीम पार्क असे अनेक पर्याय असताना महापालिकेने एकल स्त्रोत पध्दतीने कंत्राट देणे हाच घोटाळा असल्याचा आरोप गजानन काळे यांनी केला.
दर मंगळवारी ९९९ रुपये असा दर इमॅजिका पार्कचा असताना सुध्दा प्रत्येक विद्यार्थ्यामागे १११८ रुपयांचे कंत्राट महापालिकेने काढणे संशयास्पद आहे. इमॅजिका पार्क येथे कडक उन्हात नेलेल्या सहलीला अनेक विद्यार्थ्यांना जेवण दिले नसल्याचे समजते. मुळात महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळत नसल्याने अधिकाऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक होते. पण, महापालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याबरोबर बैठक न घेताच केवळ कागदी आदेश देण्याचे काम केले. सदरचा अक्षम्य हलगर्जीपणा अधिकाऱ्यांचा आहे. आयुक्त यांनी नेमलेल्या चौकशी समितीवर देखील ‘मनसे'तर्फे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. उपायुक्त आणि शिक्षण अधिकारी यांचे निलंबन न करता अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमणे चूक असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. शिक्षण विभाग संचालक आणि उपसंचालक यांनी चौकशी समिती नेमून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गजानन काळे यांनी केली.
सदर पत्रकार परिषदप्रसंगी मनसे विद्यार्थी सेना नवी मुंबई शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, नवी मुंबई शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सहसचिव अभिजीत देसाई, विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष प्रतिक खेडकर, रस्ते आस्थापना शहर अध्यक्ष संदीप गलुगडे, रोजगार विभाग शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना शहर अध्यक्ष अनिकेत पाटील, आदि उपस्थित होते.